श्रृतिका डायग्नोस्टिक सेंटरला महापालिकेची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:09+5:302021-05-19T04:25:09+5:30
कोल्हापूर : शहरातील महाराणा प्रताप चौक येथील श्रृतिका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कोविड नियमांचे पालन न केल्याने व ‘एचआरसीटी’साठी जादा रक्कम ...

श्रृतिका डायग्नोस्टिक सेंटरला महापालिकेची नोटीस
कोल्हापूर : शहरातील महाराणा प्रताप चौक येथील श्रृतिका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कोविड नियमांचे पालन न केल्याने व ‘एचआरसीटी’साठी जादा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप घार्गे यांनी या सेंटरला मंगळवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.
‘श्रृतिका’मध्ये कोविड संशयित रुग्णांच्या छातीचे एचआरसीटी स्कॅन केले असून विविध ठिकाणाहून रुग्ण या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणीसाठी येतात. याठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कोणत्याही पद्धतीची सुरक्षितता बाळगली जात नसल्याबाबत त्याचबरोबर शासनाने ‘एचआरसीटी’साठी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा रक्कम आकारणी होत असल्याच्या तक्रारीही महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.
उपायुक्त निखिल मोरे व सहायक आयुक्त संदीप घार्गे यांनी सोमवारी सेंटला भेट दिली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. सॅनिटायझरचा वापर केला जात नव्हता. याव्यतिरिक्त रुणांबरोबर नातेवाइकांचीही गर्दी आढळून आली. याबाबत सूचना देऊनही मंगळवारी एचआरसीटीसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या सेंटरला महापालिकेच्यावतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली.
---
महापालिकेच्या नोटिसीला अनुसरुन त्यांनी चोवीस तासांच्या आत खुलासा करणे बंधनकारक आहे. वेळेत खुलासा प्राप्त न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
निखिल मोरे, उपायुक्त.