झोपडपट्टीधारकांचा महापालिकेवर मोर्चा
By Admin | Updated: December 5, 2014 00:20 IST2014-12-04T23:55:53+5:302014-12-05T00:20:26+5:30
जनसुराज्य पक्ष : सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

झोपडपट्टीधारकांचा महापालिकेवर मोर्चा
कोल्हापूर : ‘आम्ही माणसे आहोत, जगण्याचा आम्हालाही अधिकार आहे, किमान पायाभूत सुविधा तरी द्या,’ अशी मागणी करीत इंदिरानगर झोपडपट्टीधारकांनी आज, गुरुवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. दसरा चौकातून काढलेल्या या मोर्चाचे नेतृत्व जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी निवेदन स्वीकारून चार दिवसांत सुविधा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन झोपडपट्टीधारकांना दिले.
शहरात दहा घोषित, तर १६ अघोषित झोपडपट्ट्या आहेत. शहरातील अघोषित झोपडपट्टीधारक महापालिकेचा सर्व कर भरतात. मात्र, यांना कसलीही नागरी सुविधा पुरविली जात नाही. या झोपडपट्टीधारकांचे कार्ड तयार असूनही महापालिकेतर्फे वितरित केलेले नाही. अघोषित झोपडपट्टीधारकांना किमान सुविधा पुरवून महापालिकेने दिलासा द्यावा, यासाठी जनसुराज्य पक्षाने कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात पक्षातर्फे मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. महापालिकेने शहरातील झोपडपट्टी विकास कृती आराखडा तयार करावा, झोपडपट्ट्यांना किमान पायाभूत सुविधा द्याव्यात, राजीव आवास योजना कार्यक्षमपणे राबवावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे झोपडपट्टीधारकांनी केली.
इंदिरानगर झोपडपट्टीत उद्या, शुक्रवारी ताराराणी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेट द्यावी, याचा अहवाल देऊन तत्काळ सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना करावी. शहरातील सर्वच झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण क रावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी प्रशासनाला दिले. महापालिका प्रशासनाकडून झोपडपट्टीधारकांना सुविधा न मिळाल्यास पुढील आठवड्यात पुन्हा ‘जाब विचारो’ मोर्चा काढू, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)