बेकायदेशीर खासगी सावकारीप्रकरणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:03+5:302021-07-04T04:18:03+5:30
कोल्हापूर : बेकायदेशीर खासगी सावकारीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यास शनिवारी रात्री अटक केली. राजेंद्र ज्ञानदेव वरपे (वय ५१, रा. ...

बेकायदेशीर खासगी सावकारीप्रकरणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यास अटक
कोल्हापूर : बेकायदेशीर खासगी सावकारीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यास शनिवारी रात्री अटक केली. राजेंद्र ज्ञानदेव वरपे (वय ५१, रा. शिवगंगा अपार्टमेंट, सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ) असे अटक केलेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. त्याच्यासह चौघांवर पोलिसात गुन्हा नोंदवला. व्यवसायासाठी घेतलेली १८ लाख ५७ हजार रुपये व्याजासह ५३ लाख २६ हजार रुपये परत देऊनही पुन्हा मुद्दल व व्याज वसुलीसाठी तगादा लावल्याची तक्रार दीपक चंद्रकांत पिराळे (वय ५०, रा. शुक्रवार पेठ) यांनी पोलिसात केली.
तक्रारीनंतर संशयित खासगी सावकार वरपे याच्यासह मित्र सुहास जयसिंगराव घाटगे ऊर्फ पिंट्या (रा. शिवगंगा अपार्टमेंट, शनिवार पेठ), साडू रामचंद्र बापू पाटील, मेहुणी वैशाली रामचंद्र पाटील (दोघे रा. खाटांगळे, ता. करवीर) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हे दाखल झाले. संशयित वरपे हा महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये मेकॅनिक आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी दीपक पिराळे व भाऊ राहुल पिराळे यांचे स्विटी नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. दुकानात माल भरण्यासाठी दीपक पिराळे याने खासगी सावकार राजेंद्र वरपे याच्याकडून एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०१८ पर्यंत वेळोवेळी ५ टक्के, ६ टक्के व १० टक्के व्याजदराने एकूण १८ लाख ५७ हजार रुपये घेतले. त्यानंतर आतापर्यंत फिर्यादी पिराळे याने वेळोवेळी मुद्दलसह एकूण ५३ लाख २६ हजार रुपये संशयित वरपे याला दिले. तरीही वरपे याने पिराळे यांच्या पत्नी संगीता व भाऊ राहुल पिराळे यांच्या नावे वडणगे (ता. करवीर) येथील घर जबरदस्तीने मेहुणी वैशाली पाटील व साडू रामचंद्र पाटील यांच्या नावे नोटरी करार करून घेतले. सर्व मुद्दल व्याजासहीत भागवूनही वरपे याने मित्र सुहास घाटगे याच्यामार्फत पिराळे यांना वारंवार धमकी देऊन मुद्दल व व्याजाच्या वसुलीसाठी तगादा लावला. अखेर सहन न झाल्याने पिराळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात वरपेसह चौघांवर तक्रार दिली. त्यानुसार वरपेला अटक केली. ही कारवाई पो. नि. अनिल गुजर, सहा. पो. नि. संगीता शेळके यांनी व त्यांच्या पथकाने केली. खासगी सावकारीत बळी पडलेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे पोलिसांनी आवाहन केले.
पहाटे तीन ठिकाणी छापे
शुक्रवारी रात्री तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी पहाटे पोलिसांनी मुख्य संशयित वरपे याच्यासह घाटगे, वैशाली व रामचंद्र पाटील यांच्या घरावर छापे टाकले. वरपे याच्या घरझडतीत पोलिसांना मिळालेले स्टॅप, कोरे धनादेश, नोटरी करार आदी कागदपत्रे जप्त केली.
कोरोना पॉझिटिव्हच्या घराची तीन तास झडती
संशयितांपैकी एक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो होम क्वारंटाईन आहे, तरीही पोलिसांच्या पथकाने त्याच्या उपस्थितीत धाडसाने त्याच्या घराची तीन तास झडती घेतली.
फोटो नं. ०३०७२०२१-कोल-राजेंद्र वरपे(आरोपी)
030721\03kol_4_03072021_5.jpg
फोटो नं. ०३०७२०२१-कोल-राजेंद्र वरपे(आरोपी)