महापालिक चे कसबा बावडा येथील ‘एसटीपी’ पावसाळ्यात बंद
By Admin | Updated: September 11, 2014 00:13 IST2014-09-10T00:36:53+5:302014-09-11T00:13:20+5:30
ड्रेनेज लाईन नसल्याचा परिणाम : पावसाळ्यात ६० लाखांची बचत

महापालिक चे कसबा बावडा येथील ‘एसटीपी’ पावसाळ्यात बंद
कोल्हापूर : महापालिक चे कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू होऊन तीन महिने झाले. यानंतर चाचणी परीक्षणादरम्यान, उच्च न्यायालयास अहवाल देण्यापूर्वी तसेच उद्घाटनापूर्वी एक दिवस असे एकूण तीन दिवसच प्लँट सुरू झाला. शहरातील सांडपाणी उघड्या नाल्यातून वाहत असल्याने पावसाळी पाण्यावरही प्रक्रियेचे जादा पैसे मोजावे लागतात. पावसाळ्यात पाण्याचा ‘बीओडी’स्तरही चांगला असतो. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात प्लँट बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट) सध्या ४८ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.
पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेला दोनवेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) ३१ मार्चपर्यंत सुरू करण्याचे निर्देष न्यायालयाने दिले होते. मात्र, ठेकेदाराची आर्थिक अडचण व तांत्रिक बाबींमुळे प्लँट सुरू होण्यास विलंब लागला. जुलै महिन्यात वाजत-गाजत महापालिकेने प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, यानंतरही प्लँट बंदच राहिल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
पुनर्वापराचे आव्हान
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा बी.ओ.डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक) १० एम.जी. प्रती लिटरपेक्षा कमी असण्याचा दावा महापालिकेने केला.
या वर्षाअखेरपर्यंत ७६ एमएलडी पाण्यावर प्रक्रियाची शक्यता आहे. केंद्रातून बाहेर पडणारे हे पाणी किमान शंभर एकर शेतीसह, बागा, बांधकाम आदींसाठी वापरण्याची योजना आहे. या पाण्याच्या पुनर्वापराचे आव्हान आहे.
६० लाखांची बचत
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते.
एक एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रूपये खर्च येतो. प्रक्रिया केंद्राची सध्याची क्षमता ४८ एमएलडी आहे.
प्रतिदिन ६७ हजार ७२८ रुपये सांडपाण्यावर प्रक्रियाचा खर्च करावे लागतील. पावसाळ्यात केंद्र बंद ठेवल्याने ६० लाख ९५ हजार रुपयांची बचत होते.