महापालिकेचा बोंद्रेनगरातील बायोगॅस प्लँट यशस्वी

By Admin | Updated: December 30, 2016 00:58 IST2016-12-30T00:58:48+5:302016-12-30T00:58:48+5:30

झोपडपट्टीतील लोकांचा प्रतिसाद : प्रदूषणमुक्त, रोगराई कमी होण्यास मदत-- गुड न्यूज

Municipal Corporation's Bio Gas Plant Success in Bondarengan | महापालिकेचा बोंद्रेनगरातील बायोगॅस प्लँट यशस्वी

महापालिकेचा बोंद्रेनगरातील बायोगॅस प्लँट यशस्वी

कोल्हापूर : शहराच्या ज्या भागात ड्रेनेजलाईन नाही, त्या भागातल्या शौचालयातील मैलामिश्रीत सांडपाणी गटारीतून नाल्यात आणि नाल्याद्वारे थेट नदीत मिसळून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे; परंतु त्यावर मात करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शेल्टर असोसिएटस् या स्वंयसेवी संघटनेच्या (एनजीओ) माध्यमातून बोंद्रेनगर झोपडपट्टीत साकारलेला बायोगॅस प्लँट यशस्वी झाला असून झोपडपट्टीतील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा प्लँट ‘पथदर्शी प्रकल्प’ ठरला आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे बोंद्रेनगर परिसरातील गटारी, नाल्यातून वाहणाऱ्या मैलामिश्रीत सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून त्यामुळे प्रदूषण तसेच रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिकेने १९ लाख रुपये तर शेल्टर असोसिएटस्ने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.
बोंद्रेनगर परिसरात छोटी झोपडपट्टी आहे तेथील नागरिकांच्या सोयीस्तव महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालयदेखील बांधले आहे; परंतु त्या भागात ड्रेनेज लाईन नसल्याने शौचालयातील सर्व सांडपाणी थेट गटारीत, छोट्या नाल्यात मिसळत होते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव होत होता. ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशभर राबविले जात असताना महानगरपालिकेने ‘घर तेथे शौचालय’ योजना राबविण्यास सुरुवात केली. बोंद्रनगर झोपडपट्टीत एकाही झोपडीत वैयक्तिक शौचालय
नव्हते. त्यामुळेच बायोगॅस प्लँटसाठी या झोपडपट्टीची निवड करण्यात आली.
प्रकल्पातंर्गत झोपडपट्टीतील ६६ झोपड्यांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. ‘शेल्टर’ संस्थेने सर्व झोपड्यांतील शौचालयांना टाईल्ससह सर्वप्रकारचे साहित्य पुरविले आहे तर महानगरपालिकेने शंभर मीटर परिसरात ड्रेनेज लाईन टाकून त्या शौचालयांना जोडली आहे. या झोपड्या कमी जागेत असल्याने त्यांना सेफ्टिंग टॅँक दिले तरी ते बसविणे अशक्य होते. त्यामुळे सर्व शौचालये थेट प्लॅँटला जोडली आहेत शिवाय २० बाय ३० आकाराचा एक बायोगॅस प्लॅँट तयार केला आहे. सर्व झोपड्यांतील मैलामिश्रीत सांडपाणी या प्लॅँटमध्ये जमा होते. प्लॅँटमधील तयार होणारा गॅस घरगुती वापराकरीता तीन कुुटुंबांना देण्यात आला आहे. त्याच्या मोबदल्यात ही कुटुंबे प्लँटची देखभाल करतात. सांगलीच्या शिवसदन या संस्थेने या प्लँटच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)


बायोगॅस प्लॅँटमुळे प्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. प्लॅँटमध्ये मैलामिश्रीत सांडपाण्याव्यतिरिक्त जनावरांचे शेण टाकण्यात येते. तयार होणाऱ्या गॅसचा कसलाही वास येत नाही. झोपडपट्टीतील नागरिकांच्या सहकार्यामुळे प्लॅँट यशस्वी झाला. शहराच्या अन्य भागांत अशाप्रकारच्या प्लॅँटसाठी मागणी आली तर त्याचा विचार करण्यात येईल. - डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महानगरपालिका

Web Title: Municipal Corporation's Bio Gas Plant Success in Bondarengan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.