कोरोनाग्रस्त कुष्ठरुग्णांसाठी धावली महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:06+5:302021-05-09T04:25:06+5:30
कोल्हापूर : धडधाकटांना बेडसाठी वणवण करावी लागत असताना महापालिकेचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी धावून आले आणि कोरोनाची लागण झालेल्या शेंडा ...

कोरोनाग्रस्त कुष्ठरुग्णांसाठी धावली महापालिका
कोल्हापूर : धडधाकटांना बेडसाठी वणवण करावी लागत असताना महापालिकेचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी धावून आले आणि कोरोनाची लागण झालेल्या शेंडा पार्कातील कुष्ठरोग्यांना बेड मिळाले. सायबर येथील कोविड केअर सेंटरमध्ये संताजी घाेरपडे यांनी कुष्ठधाममधील पाच अंध व अपंग कुष्ठरोग्यांना दाखल करून घेत उपचारही सुरू केल्याने माणुसकीचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.
शेंडा पार्क येथील स्वाधारनगर येथील कोरोनाबाधित एका रुग्णाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर महापालिकेने या परिसरातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली. यात ५ अपंग व अंध कुष्ठरोगी हे पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांना औषधोपचारासाठी ॲडमिट करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य
कर्मचाऱ्यांनी शहरात सर्वत्र पाहणी केली. परंतु शुश्रूषेच्या दृष्टिकोनातून या अंध व अपंग रुग्णांना स्वतंत्र अलगीकरण कक्षामध्ये दाखल करावयाचे असल्याने त्यांना बेड उपलब्ध होताना अडचणी निर्माण होत होत्या. अखेर त्यांनी ही बाब उपायुक्त निखिल मोरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मोरे यांनी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांना फोन करून दाखल करून घेण्याची विनंती केली. घोरपडे यांनी तत्काळ या निराधार व असाहाय्य रुग्णांकरिता सायबर कॉलेजमधील सेंटरमध्ये दुसऱ्या मजल्यावर विशेष अलगीकरण कक्षात दाखल करून डॉ. संगीता निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचारही सुरू केले.
हे असाहाय्य रुग्ण दाखल करण्यासाठी आयसोलेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्पिता खैरमोडे, ए.एन.एम. सरिता चोपडे यांच्यासह नागरी आरोग्य केंद्र क्रमांक ७ चे आरोग्य सेवक यांनी हातभार लावला.
फोटो ०८०५२०२१-कोल-शेंडा पार्क ०१, शेंडा पार्क ०२
फोटो ओळ: कोल्हापुरात शनिवारी शेंडा पार्कात आढळलेल्या अंध, अपंग कोरोनाग्रस्तांना महापालिकेच्या मदतीने रुग्णवाहिकेतून सायबर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.