महापालिकेत ‘सत्ते’ पे सत्ताच
By Admin | Updated: August 18, 2015 00:47 IST2015-08-18T00:47:43+5:302015-08-18T00:47:43+5:30
निवडणूक रणांगण : प्रत्येक उमेदवारापुढे सात पर्याय

महापालिकेत ‘सत्ते’ पे सत्ताच
कोल्हापूर : महापालिकेच्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडे इच्छुकांची गर्दी आहे. परंतु, त्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची वानवा आहे. दोन्ही काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडीसह शिवसेना यांची सक्षम उमेदवार शोधताना दमछाक होणार आहे. ‘चांगला एक उमेदवार आणि त्याच्यापुढे सात पर्याय’ अशी आजची स्थिती आहे.
महापालिकेसारख्या निवडणुकीत पक्षीय बांधीलकीचा फारसा विचार होत नसल्यामुळे सोयीनुसार कुणी कोणत्याही पक्षांकडून लढणार आहे. पती ‘राष्ट्रवादी’कडून तर पत्नी ‘ताराराणी, भाजप किंवा शिवसेने’कडून असेही चित्र काही प्रभागांत दिसणार आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये चांगली मते मिळाली. ‘कोल्हापूर दक्षिण मतदारसंघा’तून पक्षाच्या चिन्हावर अमल महाडिक आमदार झाले, तरी तेथे पक्षाच्या संघटनापेक्षा ‘मोदी फॅक्टर’ व महाडिक यांच्या राजकीय ताकदीचा तो विजय होता. त्यामुळे ‘दक्षिणे’त भाजपशी एकनिष्ठ असलेला सक्षम उमेदवार म्हणून सुभाष रामुगडेंचा अपवाद वगळता एकही नाव चटकन सांगता येत नाही. ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे. तेथे विधानसभेला महेश जाधव यांनी चांगली मते घेतली तरी त्यामध्ये गुजराती, जैन, लिंगायत समाजाचा वाटा मोठा राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा समाजघटक पक्षाकडे वळला. आता महापालिकेचा विचार करताना ‘पक्षाचे निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्ते’ असा विचार केल्यास नगरसेवक आर. डी. पाटील, अजित ठाणेकर, संदीप देसाई ही नावे सोडल्यास चौथे नाव सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘भाजपची उमेदवारी व ताराराणी आघाडीचे उमेदवार’ अशी सोयरिक तेथे करावी लागणार आहे. भाजप व ताराराणी आघाडीमध्ये ८१ पैकी सुमारे ३५ जागा भाजपला देण्याचे ठरत आहे. त्यातील बहुतांशी जागा या दक्षिण मतदारसंघातीलच असतील. राहिलेल्या जागा या ‘कोल्हापूर उत्तर’मधील असतील, परंतु तेथेही उमेदवार शोधताना भाजपच्या नाकीनऊ येणार आहे.
काँग्रेस सध्या महापालिकेत सत्तारूढ आहे. परंतु, तेथेही हीच अवस्था आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यामुळे कोल्हापूर दक्षिण व कसबा बावड्यात उमेदवारांची चुरस आहे. परंतु, ‘उत्तर’मध्ये आता काँग्रेसला कुणी वाली नाही. माजी आमदार मालोजीराजे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यायचा नाही, असे ठरविल्याने त्यांना मानणारे जे काही चार-दोन लोक होते ते ताराराणी आघाडी किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये ताकदीचे उमेदवार देताना काँग्रेसला घाम फुटणार आहे. राष्ट्रवादी व जनसुराज्यची आघाडी असली तरी तेथेही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गतनिवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री असल्याने व आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील वादात काँग्रेसचे ताकदीचे उमेदवार ‘राष्ट्रवादी’ला आयते मिळाले. आताही तशाच घडामोडींच्या प्रतीक्षेत हा पक्ष आहे. ‘जनसुराज्य’ची स्थिती त्याहून अवघड आहे. शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यांना ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये काही प्रमाणात ताकदीचे उमेदवार आहेत, परंतु ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये जे प्रभाग येतात तेथे हीच स्थिती आहे. विधानसभेला या मतदारसंघातून विजय देवणे यांना कशीबशी नऊ हजार मते मिळाली होती. तोच मतदार आता महापालिकेलाही मतदान करणार आहे.
उमेदवारांची अडचण का..
या सर्वच पक्षांकडे कार्यकर्त्यांचे संघटन आहे, परंतु नुसते लढाऊ कार्यकर्ते असून भागत नाही. त्यांच्याकडे आर्थिक ताकद तर हवीच शिवाय दंडुकशाहीतही तो मागे असून चालत नाही. प्रत्यक्ष मतदान अजून दोन-सव्वा दोन महिने आहे तोपर्यंतच शिवाजी पेठेतील काही प्रभागांत तीन-तीन जेवणे झाली आहेत. एक जेवण लाखाच्या आत होत नाही. एवढे पैसे खर्च करण्याची ज्यांची ताकद आहे असे उमेदवार पक्षांना हवे आहेत. पक्षासाठी राबणारा कार्यकर्ता कुणाला नको आहे. त्यास उमेदवारी दिली तर तो निवडून येत नाही.
आरक्षणामुळेही अडचण
ज्यांनी लढायचे म्हणून तयारी केली आहे, त्यांचा प्रभाग आरक्षित झाला आहे. त्यामुळे उमेदवारांची नव्याने शोधाशोध करावी लागत आहे. हे देखील उमेदवारांची चणचण भासण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. नव्या कायद्यामुळे महिलांना पन्नास टक्के आरक्षण यंदा प्रथमच लागू झाले आहे. त्यामुळे ४१ प्रभाग त्यांच्यासाठी आरक्षित झाले. तिथे आता आरक्षण निश्चित झाल्यावर उमेदवार कोण याची शोधाशोध सुरू झाली आहे.
६५ जागांचे उमेदवार निश्चित
भाजप व ताराराणी आघाडीचे मिळून सुमारे ६५ उमेदवारांची प्राथमिक यादी तयार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. प्रत्येक प्रभागांतून विविध पर्यायांची चाचपणी आघाडीकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे नावे निश्चित असली तरी ती लवकर जाहीर करून विरोधकांना बळ मिळू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.