महापालिकेने गाठला दोन लाख लसीकरणाचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:44+5:302021-09-04T04:29:44+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू केली असून, या मोहिमेत आत्तापर्यंत पहिला डोस दोन लाख ०४ ...

महापालिकेने गाठला दोन लाख लसीकरणाचा टप्पा
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू केली असून, या मोहिमेत आत्तापर्यंत पहिला डोस दोन लाख ०४ हजार ७३८ नागरिकांना, तर दुसरा डोस एक लाख ११ हजार ४९८ नागरिकांना दिला आहे. दुसऱ्या डोसचे हे प्रमाण राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक असून, लसीकरणाच्या माध्यमातून महापालिकेचे जास्तीत-जास्त नागरिकांना कोविडपासून पूर्ण संरक्षण देण्याचे प्रयत्न आहेत.
शहरातील नागरिकांना पहिला डोस देण्याचे प्रमाण ४५ टक्के, तर दुसरा डोस देण्याचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना ऑन द स्पॉट लसीकरण महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर दिले जाते. तसेच दुसरा डोस ज्या नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांनासुध्दा ऑन द स्पॉट लसीकरण सर्व आरोग्य केंद्रांवर दिले जात आहे. प्रत्येकदिवशी पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
वर्गवारी उद्दिष्ट पहिला डोस दुसरा डोस
- हेल्थ केअर वर्कर - १३,६८८ १३,६८८ ९५३४
फ्रंटलाईन वर्कर - १२,०८४ १२,०८४ ६६७२
१८ ते ४४ वर्ष वयोगट - २,८२,०८८ ५६,२११ ९६३२
४५ ते ५९ वर्ष वयोगट - १,०८,३६३ ६२,८८६ ४५,४९२
६० वर्षांवरील ७२२४२ ५९,८६९ ४०१८
कोल्हापूर शहरासाठी चार लाख ८८ हजार ४६५ नागरिकांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी दोन लाख ०४ हजार ७३८ नागरिकांना पहिला डोस, तर एक लाख ११ हजार ४९८ नागरिकांना दुसरा डोस दिला आहे.
४५ वर्षांवरील ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांनी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे तसेच १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी ऑनलाईन स्लॉट बुक करून लसीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि गरोदर माता यांच्यासाठी प्रत्येक सोमवारी विशेष लसीकरण सत्र आयोजित केले जाते. नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.