‘नगरपालिके’चीच १२८ वर्षांपासून वहिवाट !
By Admin | Updated: January 2, 2015 00:16 IST2015-01-01T23:38:31+5:302015-01-02T00:16:13+5:30
गडहिंग्लज नगरपालिका : ५४ वर्षांपूर्वी भाड्याने दिलेली धर्मशाळा, महसूल खाते भाडेही देत नाही अन् जागाही सोडत नाही

‘नगरपालिके’चीच १२८ वर्षांपासून वहिवाट !
राम मगदूम- गडहिंग्लज -१९८७ मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थान काळात गडहिंग्लज नगरपालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून पालिका हद्दीतील सहकारी मालकीच्या जागा, इमारती व रस्ते, इत्यादी नगरपालिकेकडे रीतसर हस्तांतरित झाल्या. याच मिळकतींपैकी एक आणि गडहिंग्लज म्युन्सिपालिटी वहिवाटदार असणाऱ्या सि.स.नं. १३२६ मधील ४७३०.५ चौ. मी. जागेतील भाडोत्री धर्मशाळा इमारतीमध्ये ५४ वर्षांपूर्वी ‘प्रांतकचेरी’ सुरू झाली. आजतागायत ती याच जागेत आहे. १९५९ मध्ये गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड या तालुक्यांसाठी गडहिंग्लज येथे प्रांतकचेरी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तत्कालीन कलेक्टरनी गडहिंग्लज म्युन्सिपालिटीच्या तत्कालीन प्रेसिडेंटना धर्मशाळेची इमारत दोन वर्षांकरिता भाड्याने देण्याची मागणी केली. जनतेच्या सोयीसाठी गडहिंग्लजमध्ये प्रांतकचेरी लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून नगरपालिकेने सर्क्युलर प्रेपोझिशनने ठराव करून ही जागा महसूल खात्याला उपलब्ध करून दिली.
३१ डिसेंबर १९६० रोजी अॅडिशनल मामलेदार यांनी ताबा पावती करून नगरपालिकेकडून खुल्या जागेसह धर्मशाळा इमारत रीतसर ताब्यात घेतली.
१९६१ मध्ये तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पालिकेने आपल्या उत्पन्नातून या इमारतीचा गिलावा, लाईट फिटिंग, फरशी, इत्यादी सोयी करून दिल्या. सुरूवातीला प्रांत कार्यालयाचे भाडे दरमहा १४३ रूपये इतके ठरले होते, त्याप्रमाणे ते जमा केले जात होते.
१९७३ मध्ये प्रांत कार्यालयात ट्युबलाईट व फॅन बसवून दिले. इमारतीचे सिलिंग मॅसोनेट व कार्यालयीन जीपसाठी शेडही पालिकेने बांधून दिले. त्यासाठी
७ हजार रूपये खर्च केले होते. त्यामुळे दरमहा ३०० रूपये भाडे अदा करण्याची मागणी तत्कालीन नगराध्यक्षांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. ठरलेले भाडेदेखील अदा होत नव्हते व थकबाकी राहत होती. त्यासंदर्भात पालिकेने प्रांतकार्यालयाशी वेळोवेळी
पत्रव्यवहारही केला आहे.
सुमारे २३ वर्षांपासूनचे मार्च २०१५ पर्यंत सुमारे ४० हजार ८९८ रूपये इतके भाडे अद्याप थकित आहे. महसूल खाते भाडेही देत नाही व जागादेखील पालिककडे हस्तांतरित करीत नाही. शहराच्या मध्यवर्ती व बसस्थानकासमोरील मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुल बांधून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी धडपडणाऱ्या पालिकेची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळेच या संघर्षाला नव्याने तोंड फुटले आहे.
५४ वर्षांपूर्वी गडहिंग्लज नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या धर्मशाळा इमारतीत ‘प्रांतकचेरी’ सुरू झाली. सुमारे २३ वर्षांपासून त्याचे भाडेही थकित आहे. शहर विकास आराखड्यात दुकानगाळ्यांसाठी आरक्षित या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. मात्र, वेळोवेळी मागणी करूनदेखील ही जागा महसूल खात्याने पालिकेकडे अद्याप हस्तांतरित केलेली नाही. आठवड्यापूर्वी सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भूमिअभिलेख खात्याने त्या जागेस वहिवाटदार म्हणून उपविभागीय अधिकारी यांचे नाव लावल्यामुळे या जागेच्या मालकीसंदर्भात प्रांतकचेरी व नगरपालिका यांच्यात नवा संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्रांतकचेरी’ची कुळकथा आजपासून..
१७ जून १९५९ : धर्मशाळेची इमारत प्रांतकचेरीसाठी भाड्याने देण्याची तत्कालीन कलेक्टर यांची समक्ष मागणी.
१ जुलै १९५९ : सर्क्युलर प्रेपोझिशनने जागा उपलब्ध करून देण्याचा म्युन्सिपालिटीचा निर्णय.
३१ जुलै १९५९ : म्युन्सिपालिटीच्या जनरल कमिटीत ठराव क्रमांक ४६ ने विषयास मंजुरी.
२३ डिसेंबर १९६० : जागेचा ताबा घेण्याबाबत तारेने प्रांताधिकाऱ्यांची मामलेदारांना सूचना.
३१ डिसेंबर १९६० : अॅडिशनल मामलेदारांनी पावतीद्वारे धर्मशाळेचा ताबा घेतला.
५ एप्रिल १९६१ : धर्मशाळेच्या पाठीमागील खोल्यांचा ताबा अव्वल कारकुनांनी घेतला.