युनिटीवरून मनपा प्रशासन ‘हिटलिस्ट’वर
By Admin | Updated: January 19, 2015 00:31 IST2015-01-19T00:10:34+5:302015-01-19T00:31:28+5:30
नगरसेवकांचा सवाल : दीड कि.मी.ने अंतर कमी झाल्याने खर्चाचे काय?

युनिटीवरून मनपा प्रशासन ‘हिटलिस्ट’वर
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी सल्लागार कंपनी असलेल्या ‘युनिटी कन्सलन्टसी’च्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. लांबलेली निविदा प्रक्रिया, त्यानंतर डीपीआरमुळे योजनेच्या खर्चात वाढ, विविध शासकीय विभागांतील परवानग्यांचे त्रांगडे, पाईपलाईनच्या प्रत्यक्ष कामाची वेळ आली तरीही सर्वेक्षणाचा सुरू असलेला घोळ, आदींमुळे सल्लागार कंपनीला बदला, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काळम्मावाडी पाईपलाईन योजनेतील १७० कोटी रुपयांचा निधी येऊन दीड वर्ष झाले. सल्लागार
कंपनीला दिलेले ५० लाख रुपये ेवगळता योजनेवर अल्पखर्च झाला आहे. पैसे घेऊनही सल्लागार कंपनीने भूमिका निभावलेली नाही. सुरुवातीस स्पायरल की लाँगिट्युडनल वेल्डेड पाईप हा घोळ कंपनीने घातला. स्पायरल वेल्डेडवर शिक्कामोर्तब झाले. तोपर्यंत योजना रेंगाळल्याने ‘डीपीआर’मध्ये फरक पडला. १०० कोटींनी खर्चात वाढ होऊन योजना ४८० कोटींवर गेली. खर्चाचा मेळ महापालिकेने घालण्याचे नियोजन केले. आता योजना सुरू होणार असे चित्र निर्माण झाले, तोपर्यंत भूसंपादनासाठी शासकीय परवानग्या घेतल्या नसल्याने योजना पुन्हा लांबलीवर पडली.
जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग यांच्या परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत.
वन्यजीव विभागाची परवानगी मिळविण्यास तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता
आहे. परवानग्यांचे त्रांगडे सुरू असतानाच आता जॅकवेल बांधणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. योजनेचा डीपीआर पूर्ण झाल्यानंतर आता योजनेचा मार्गात बदल करून दीड किलोमीटरचे अंतर कमी करण्यात आले आहे. त्यामुळे खर्चात कपात होणार असली तरी याचा तपशील अद्याप सल्लागार कंपनीने दिलेला नाही, असा आरोप नगरसेवकांतून होत आहे. एकंदरच सल्लागार कंपनीच्या कारभारावरून
थेट पाईपलाईनचा मुद्दा पुन्हा तापणार असल्याचे चित्र आहे.
(प्रतिनिधी)