चौदा लाखांच्या फसवणूकप्रकरणी मुंबईतील तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:48+5:302021-01-13T05:02:48+5:30
कोल्हापूर : निम्म्या किमतीने वस्तू देण्याचे आमिष दाखवून त्या बदलात गिफ्ट कार्ड देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तरुणाला अटक ...

चौदा लाखांच्या फसवणूकप्रकरणी मुंबईतील तरुणाला अटक
कोल्हापूर : निम्म्या किमतीने वस्तू देण्याचे आमिष दाखवून त्या बदलात गिफ्ट कार्ड देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तरुणाला अटक केली. आविष्कार सुनील पाटील (वय २९, रा. वरळी, मुंबई), असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईतील संशयित सुनील पाटील व आविष्कार पाटील या पिता-पुत्रांनी कोल्हापुरात अनेकांचा विश्वास संपादन केला. त्या सर्वांना एका मॉलचे गिफ्ट कार्ड दिले. त्या आधारे निम्म्या किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचे त्यांनी आमिष दाखविले. दोघांनी सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत १४ लाख एक हजार रुपयांना गंडा घातल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयित आविष्कार पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयिताबाबत तपास करताना त्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काहींची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. याबाबत ज्यांची तक्रार आहे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी केले आहे.