मुंबई आर.सी.एफ. अंतिम फेरीत
By Admin | Updated: April 9, 2016 00:56 IST2016-04-09T00:20:41+5:302016-04-09T00:56:38+5:30
व्ही.आय.पी. चषक क्रिकेट

मुंबई आर.सी.एफ. अंतिम फेरीत
कोल्हापूर : फायटर्स स्पोर्टस् क्लब आयोजित व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात आर. सी. एफ. (मुंबई) संघाने हुंडेकरी स्पोर्टस्चा ७ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरी, तर पुण्याच्या प्रथम स्पोर्टस्ने पॅकर्स स्पोर्टस्चा २८३ धावांनी पराभव करीत पुढील फेरी गाठली.
शास्त्रीनगर मैदानावर आर.सी.एफ. व हुंडेकरी स्पोर्टस् यांच्यात उपांत्य फेरीतील सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना हुंडेकरी संघाने ३४.४ षटकांत सर्वबाद १२९ धावा केल्या. यामध्ये अजिम काझीने ३३, मुर्तझा ट्रंकवालाने १५, आशिष देशमुखने १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना आर.सी.एफ.कडून भारतसिंगने ४, अंकुरसिंगने ३, तर विजय पावसेने २ व सुनील चावरे याने १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना आर.सी.एफ.ने २२.५ षटकांत ३ बाद १३२ धावा काढून अंतिम फेरी गाठली. यामध्ये सुनील चावरेने नाबाद ४०, तरनजितसिंग धिलॉनने ३३, तर रवी सोळंकीने नाबाद ३२ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये हुंडेकरी संघाकडून अरिफ शेख, अजिम काझी, अभी दुधे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना येथे प्रथम स्पोर्टस् (पुणे) व पॅकर्स क्लब यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रथम स्पोर्टस्ने ४० षटकांत ६ बाद ४४७ धावांचा डोंगर रचला. यामध्ये वृषभ राठोडने ६३ चेंडूंत नाबाद १५८, तर यश नहारनेही त्यास साथ देत ५१ चेंडूंत ११४ धावा केल्या, तर शुभम रांजणे व अमेय सोमण यांनी प्रत्येकी ४६ धावा करीत आपल्या संघाची धावसंख्या ४४७ अशी विशाल केली. ‘पॅकर्स’कडून हर्षल बोरसेने २, तर मनोज लोखंडे, सौरभ श्रींगारे, अनिल पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना पॅकर्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २७ षटकांत १६४ धावांत गुंडाळला. यामध्ये अनिल पाटीलने नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्यास सचिन उपाध्येने २३ व देवेश वराडेने ३४ धावा काढून मोलाची साथ दिली.
मात्र, मोठ्या धावसंख्येने होणारा पराभव हे फलंदाज रोखू शकले नाहीत. प्रथम संघाकडून रुपेश पोपेता याने तीन, तर विजय कोहली, हितेश वलुनी, अमेय सोमण, महेश शिंदे, यश नहार, वृषभ राठोड यांनी प्रत्येकी एक बळी घेत पॅकर्सचा संघ १६४ धावांत गारद करीत तब्बल २८३ धावांनी मात केली. सामनावीर म्हणून वृषभ राठोडला गौरविण्यात आले.