निपाणीतील गांधी हॉस्पिटल ‘सलाईन’वर!
By Admin | Updated: July 10, 2015 21:50 IST2015-07-10T21:50:31+5:302015-07-10T21:50:31+5:30
तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी प्रयत्नशील

निपाणीतील गांधी हॉस्पिटल ‘सलाईन’वर!
राजेंद्र हजारे -निपाणी--कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागातून निपाणी शहरात शेकडो रुग्ण येथील शासकीय गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात. शिवाय या शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत असतात; पण या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असून, विविध कारणांमुळे गांधी हॉस्पिटलच सलाईनवर आहे.
निपाणी येथे सुमारे १५ एकर जागेवर गांधी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. सध्या हे हॉस्पिटल समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये डॉ. हेब्बाळी हे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर सीमा गुंजाळ या एकमेव स्त्री रोगतज्ज्ञ आहेत.
येथे दिवसभरात १५० ते २०० रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात; पण तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. परिणामी सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ पोहोचत आहे.
या रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रिया करणे कठीण होत आहे. डी ग्रुप (शिपाई) पदे सात मंजूर असून, त्यापैकी केवळ तीन पदे कार्यरत आहेत. तसेच नर्स आणि कुष्ठरोग, पर्यवेक्षकपदेही रिकामी आहेत. रविवारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही वानवा दिसली. अलीकडच्या काळात महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे; पण गांधी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होत नसल्याने सर्वच अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात येते. काही वर्षांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये १०० कॉटचे सुसज्ज हॉस्पिटल आणि ट्रॉमाकेअर सेंटर उभारण्याची घोषणा झाली होती. पण, आजतागायत त्याच्या निर्मितीच्यादृष्टीने पावले उचलण्यात आलेली नाहीत. तरी संबंधितांना या गांधी हॉस्पिटलकडे लक्ष देऊन हॉस्पिटलला गतवैभव मिळवून देण्याची मागणी निपाणी आणि ग्रामीण भागातून होत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी प्रयत्नशील
निपाणी भागातील रुग्णांना गांधी हॉस्पिटल वरदान ठरले आहे. या ठिकाणी होणारी अडचण निदर्शनास आली आहे. विधानसभा अधिवेशनात याबाबत चर्चा करून लवकरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसह अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी सांगितले.