मुंबईतील दिग्गज आज भरणार अर्ज

By Admin | Updated: April 1, 2016 01:30 IST2016-04-01T01:21:19+5:302016-04-01T01:30:26+5:30

चित्रपट महामंडळ निवडणूक : दीपाली सय्यद, बिडकर, बारगीर यांच्यासह ३४ जणांचे अर्ज

Mumbai giants today filed their application | मुंबईतील दिग्गज आज भरणार अर्ज

मुंबईतील दिग्गज आज भरणार अर्ज

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची जशी शेवटची तारीख जवळ येईल, तशी रंगत वाढू लागली आहे. अर्ज भरण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर, माजी अध्यक्ष विजय कोंडके यांच्यासह दिग्गज अर्ज भरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, गुरुवारी विद्यमान संचालक सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह ३४ अर्ज दाखल केले.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी विद्यमान संचालक बारगीर, बिडकर व अभिनेत्री दीपाली सय्यद, इम्फाचे संचालक बाळासाहेब गोरे, अ‍ॅड. मोहन पिंपळे यांच्यासह कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून ३४ अर्ज दाखल झाले असून एकूण ४९ जणांनी निवडणुकीच्या रिंगणात अर्ज भरून उडी घेतली आहे. त्यामुळे आज विद्यमान अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर, निर्माते, दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, महेश मांजरेकर, अमेय खोपकर, आदी दिग्गजांचे अर्ज दाखल होणार आहेत. यात सूचकांमार्फतही काही मंडळी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. विक्रमी संख्येने अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. आजअखेर ४९ अर्ज, तर शेवटच्या अंतिम दिवशी किमान ७५ ते ८० अर्ज दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिन्ही केंद्रांतून १७५ हून अधिक अर्जांची विक्री झाली आहे.


कृती समितीच्या दाव्याचा निकाल उद्या ?
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव कृती समितीने दाखल केलेल्या न्यायालयीन दाव्यांमध्ये गुरुवारी न्यायालयाने महामंडळ व कृती समितीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे पुढील सुनावणी उद्या, शनिवारी होणार आहे. या सुनावणीत निकाल लागण्याची शक्यता रंगकर्र्मींकडून व्यक्त होत आहे.
पाच पॅनेल होणार ?
मुंबईतून विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर, विजय कोंडके, अ‍ॅड. मोहन पिंपळे, प्रसाद सुर्वे आणि कोल्हापुरातील स्थानिक रंगकर्मीचे असे एकूण ५ पॅनेल आणि स्वतंत्र अपक्ष म्हणून लढविणाऱ्यांची संख्या लक्षात घेता विक्रमी मतपत्रिका होण्याची चिन्हे आहेत.
विजय कोंडके यांचे पॅनेल
गुरुवारी रात्री माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विजय कोंडके यांनी आपले पॅनेल जाहीर केले. विजय कोंडके (निर्माता), गजेंद्र अहिरे (दिग्दर्शक), संजय पवार (लेखक), संजीव भंडार (वितरण, प्रदर्शन), मिलिंद गवळी, संदीप नंदू होनप, (अभिनेता), अभिनेत्री पूजा पवार (अभिनेत्री गट), वासू पाटील (कला), चंद्रशेखर अय्यर (छायाचित्रण),
सुरेंद्र केतकर (संकलन), महादेव दळवी (रंगभूषा, वेशभूषा), अशोक जाधव (निर्मिती व्यवस्था), प्रकाश निकम (ध्वनिलेखक), मधू पाटील (कामगार).

Web Title: Mumbai giants today filed their application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.