भिन्न क्षमतेच्या ताऱ्यांना ‘मुक्ता’चे पंख...

By Admin | Updated: August 26, 2015 00:11 IST2015-08-26T00:11:30+5:302015-08-26T00:11:30+5:30

हेल्पर्स, चेतना, अंधशाळेला अर्थसाहाय्य : विद्यार्थ्यांच्या कलादर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम

'Mukta' wings of stars of different capacities ... | भिन्न क्षमतेच्या ताऱ्यांना ‘मुक्ता’चे पंख...

भिन्न क्षमतेच्या ताऱ्यांना ‘मुक्ता’चे पंख...

कोल्हापूर : समाजात सर्वसामान्य म्हणून वावरणाऱ्या व्यक्तींना लाजवेल असा सळसळता उत्साह, शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्व आलेले असले तरी त्यावर मात करीत गायन, नृत्य, विविध कला आणि स्वावलंबनाने आपल्यातील भिन्न क्षमता मांडणाऱ्या ताऱ्यांच्या स्वप्नांना ‘मुक्ता मंच’ने आर्थिक सहकार्याचे बळ दिले. यानिमित्त झालेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विशेष विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना सकारात्मक जगण्याची जणू दृष्टीच दिली. शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी मुक्ता मंचने हेल्पर्स आॅफ दि हँडिकॅप्ड, चेतना अपंगमती विकास संस्था आणि ज्ञानप्रबोधिनी संचलित अंधशाळा या तीन संस्थांमधील भिन्नक्षम विद्यार्थ्यांच्या कलादर्शनाचा ‘तारे जमीं पर’, ‘मूव्हिंग द वर्ल्ड टुगेदर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर उपस्थित होते. यावेळी ‘हेल्पर्स’ संस्थेचे पी. डी. देशपांडे, चेतना संस्थेचे कार्याध्यक्ष पवन खेबुडकर, अंधशाळेचे प्रकाश पाटील, ‘मुक्ता’ संस्थेच्या सुवर्णा गांधी, उज्ज्वला कर्नावट, वर्षा जैन, नीता कोठारी उपस्थित होत्या.
यावेळी शिपूरकर यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेचा संदर्भ देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी ‘हेल्पर्स आॅफ द हँडिकॅप्ड’मधील मुलामुलींनी चाकाच्या खुर्चीवरून विविध प्रकारच्या संगीतावर डोलणारा व पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारा नृत्याविष्कार सादर केला. चेतना विकास संस्थेच्या अपंगमती विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा, छोटा भीम, नन्हा मुन्हा राही हूॅँ, आज दिल है पानी, दबंग, अशा विविध गीतांवर नृत्य सादर केले. ‘ज्ञानप्रबोधिनी’ संचलित अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार गीते सादर केली.

Web Title: 'Mukta' wings of stars of different capacities ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.