अर्जुनीत पगारासाठी मुकादमाचा खून
By Admin | Updated: October 17, 2015 00:18 IST2015-10-17T00:17:39+5:302015-10-17T00:18:09+5:30
संशयितास अटक : कोयत्याने वार

अर्जुनीत पगारासाठी मुकादमाचा खून
मुरगूड : अर्जुनी (ता. कागल) येथील दगड फोडण्याचे बालाजी क्रशरमध्ये सात महिन्यांपासून काम करणारा तमण्णा मारुती घरबुडे (वय २५, रा. जैनापूर, ता. चिकोडी) या तरुणाने आपला पगार का दिला नाही म्हणून मुकादम सिद्राम लक्ष्मण सोलापुरे (वय ६0, रा. तोरणाहाळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) याचा क ोयत्याने वार करून खून केला. तमण्णाने सिद्रामचा मृतदेह पालापाचोळ््यात लपविण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी दुपारी मुरगूड पोलिसांनी तमण्णाला अटक केली. ही घटना शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कापशी लिंगनूर येथील अविनाश आत्माराम पोवार यांनी अर्जुनी येथे बालाजी क्रेशर या नावाने खडी व्यवसाय सुरू केला आहे. या क्रेशरवर सिद्राम सोलापुरे (वय ६0), गोपाळ दुंडाप्पा यादुगडे (वय ७0, रा. तोरणाहाळी ता. चिक्कोडी) आणि तमण्णा मारुती हारबुडे हे तिघेजण काम करीत होते. सिद्रामने तमण्णाला आपल्या जबाबदारीवर कामावर आणले होते. शुक्रवारी रात्री सिद्राम आणि तमण्णा या दोघांमध्ये पगाराच्या रकमेवरून वाद सुरू झाला. अधूनमधून असा वाद दोघांमध्ये होतच असतो. गोपाळने तिकडे दुर्लक्ष केले; पण या दोघांतील वाद विकोपाला गेला आणि हाणामारीला सुरुवात झाली. तमण्णाने कोयत्याने सिद्रामवर सपासप वार केले. त्यानंतर मृतदेह पालापाचोळ््यात लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गोपाळला आपण सिद्रामचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर सकाळी गोपाळने ही घटना दिवाणजी अनिल राजाराम बुगडे (रा. बिरदेवनगर, निपाणी) यांना सांगितली. बुगडे यांनी अविनाश पोवार यांना ही माहिती फोनवरून दिली. तत्काळ पोवार यांनी मुरगूड पोलिसांना माहिती दिली. सपोनि चंद्रकांत म्हसके यांनी मृतदेहासह संशयित तमण्णाला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)