‘एमएसआरडीसी’ संशयाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: July 14, 2015 01:11 IST2015-07-14T01:10:55+5:302015-07-14T01:11:52+5:30
टोलविरोधी कृती समितीचा आरोप

‘एमएसआरडीसी’ संशयाच्या भोवऱ्यात
कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी)ने मुंबईत सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत फेरमूल्यांकन समितीचे सदस्य व कोल्हापुरातील आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना निमंत्रण देणे अपेक्षित असताना त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाच्या बाबी संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे पत्रक कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, सोमवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईत आढावा बैठक घेतली. पण, या बैठकीला फेरमूल्यांकन समितीतील सदस्य आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना बोलविले नाही. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यांकन वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्यामध्ये योगदान आहे. त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्यामुळे सर्व बाबी संशयाच्या भोवऱ्यात अडकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांसह रस्ते विकास खात्याचे मंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री यांनी यात लक्ष घालून कोल्हापूरची व महाराष्ट्र शासनाची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाराचा वापर करण्याची आता गरज आहे. यावर अंतिम निर्णय होऊन कोल्हापूर टोलमुक्त करून आयआरबी कोल्हापुरातून हद्दपार झाले पाहिजे.