जिल्ह्यात महावितरणची ११ लाखांवर ग्राहकांना ‘एसएमएस’ सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:42+5:302021-06-19T04:16:42+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा ११ लाख ४ हजार ४७६ ग्राहकांना महावितरणकडून एसएमएस ...

जिल्ह्यात महावितरणची ११ लाखांवर ग्राहकांना ‘एसएमएस’ सेवा
कोल्हापूर : जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा ११ लाख ४ हजार ४७६ ग्राहकांना महावितरणकडून एसएमएस सेवा अहोरात्र पुरवली जात आहे. यात मीटर रीडिंग, वीज बिलाचा तपशील, वीजपुरवठा खंडित करण्याची अधिकृत नोटीस तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित व इतर विविध माहितीचा तपशीलवार माहिती पाठवली जात असल्याने ग्राहकांचीही सोय झाली आहे. तथापि अजूनही १ लाख ७०३ ग्राहकांनी नोंदणी केलेली नसल्याने सेवा पुरवण्यात अडथळे येत असल्याने नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी भाडेतत्त्वावर दिलेल्या घरातील स्वतंत्र वीजजोडणीचा ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी वीज बिल भरणाऱ्या भाडेकरू वीजवापरकर्त्यांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या घरातील भाडेकरू वीज वापरकर्त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी किंवा चुकीचे मोबाईल क्रमांक दुरुस्त करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ७०३ वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही. यामध्ये ४३ हजार ४७ हे अकृषक तसेच १३ हजार ३४६ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. ज्या ग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही, त्यांना ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. महाडिस्कॉम व महावितरणच्या ॲपवरदेखील नोंदणी करता येते.
चौकट
मोबाईल क्रमांक नोंदणी केलेले ग्राहक (विभागनिहाय)
गडहिंग्लज विभाग- १ लाख ६१ हजार १३३ (९४.५६ टक्के)
इचलकरंजी- १ लाख १४ हजार १६ (९४.८५ टक्के)
जयसिंगपूर- १ लाख ६७ हजार ३७८ (९४.०२ टक्के)
कोल्हापूर ग्रामीण एक- २ लाख ३१ हजार ७५९ (९५.५५ टक्के)
कोल्हापूर ग्रामीण दोन- २ लाख ३७ हजार ७५१ (९४.८७ टक्के)
कोल्हापूर शहर १ लाख ९२ हजार ४३९ (९६.६६ टक्के)