‘एमपीएससी’च्या निर्णयाने संभ्रम दूर, दिलासा मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:46+5:302021-01-13T05:02:46+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्याने संभ्रम दूर झाला. आम्हाला दिलासा मिळाला. तणाव ...

‘एमपीएससी’च्या निर्णयाने संभ्रम दूर, दिलासा मिळाला
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर झाल्याने संभ्रम दूर झाला. आम्हाला दिलासा मिळाला. तणाव दूर झाला, अशा प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा देणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सोमवारी व्यक्त केल्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा या ‘एमपीएससी’ने सोमवारी जाहीर केल्या. त्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ने जाणून घेतल्या.
प्रतिक्रिया
वर्षभरात कोरोनासह अन्य काही कारणांमुळे तीनवेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडली जाईल, अशी भीती अनेक परीक्षार्थींमध्ये होती. आता एमपीएससीने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याने ही भीती दूर झाली आहे. ओपन आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाबाबतची संभ्रमावस्थाही दूर केली आहे.
- राहुल अंगज, विद्यार्थी, मंगळवारपेठ
या परीक्षा कधी होणार, याबाबतची मनात धाकधूक होती. परीक्षा लांबली, तर वयोमर्यादेमुळे भविष्यातील अन्य परीक्षांची संधी मिळणार नाही, अशी भीती वाटत होती. त्याचा परिणाम अभ्यासावर होत होता. परीक्षांच्या तारखा जाहीर करून एमपीएससीने आम्हा विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
- आकांक्षा भोसले, विद्यार्थिनी, कोल्हापूर
गेल्या काही महिन्यांपासून आम्ही परीक्षांच्या सुधारित तारखांची प्रतीक्षा करीत होतो. ती संपली असून, नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्याने अभ्यास, सरावाचे पुढील वेळापत्रक ठरविणे शक्य होणार आहे.
- इंद्रजित गडकरी, विद्यार्थी, वडणगे
या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करून एमपीएससीने विद्यार्थ्यांमधील परीक्षांबाबत असणारा संभ्रम दूर केला आहे. आता पुन्हा या परीक्षांच्या तारखेत बदल करू नये, अशी भावना आम्हा विद्यार्थ्यांची आहे.
- विवेक कांबळे, विद्यार्थी, सोनाळी.
चौकट
आधी आरक्षण, मग परीक्षा
एमपीएससीने या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याच्या निर्णयाचा कोल्हापुरातील मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीने निषेध केला. परीक्षा देण्याच्या संधींची मर्यादा, ओपन किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गाची नोंद करण्यास सांगणे, पोलीस भरतीची जाहिरात, असे काही निर्णय सरकार, एमपीएससी सूडबुध्दीने मराठा समाजाच्या विरोधात घेत आहे. त्यामुळे आधी आरक्षण, मग परीक्षा अशी आमची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री, उच्चशिक्षण मंत्री, एमपीएससीच्या अध्यक्षांना पत्रे पाठविणार असल्याचे या कृती समितीचे निमंत्रक ऋतुराज माने, मंदार पाटील यांनी सांगितले.
चौकट
‘ईडब्ल्यूएस’ची नोंद करावी
ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज भरल्यास केंद्राच्या १० टक्के आरक्षणाची आणि वयोमर्यादेत सवलत मिळते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यांनी या प्रवर्गाची अर्जात नोंद करावी, असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी सांगितले.