खासदारांनी मंत्र्यांना धरले धारेवर
By Admin | Updated: November 27, 2014 00:20 IST2014-11-26T23:57:34+5:302014-11-27T00:20:04+5:30
लोकसभेत महाडिक आक्रमक : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष

खासदारांनी मंत्र्यांना धरले धारेवर
कोल्हापूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील आज, बुधवारी झालेल्या कामकाजावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. सर्व शिक्षण अभियान अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
देऊन अनेक सुविधाही दिल्या जातात; मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेभोवती संरक्षक भिंत बांधण्यास तसेच क्रीडांगण उभारण्यास निधी दिला जात नाही याकडे लक्ष वेधून महाडिक यांनी मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुषवाह यांना जाब विचारला. यावेळी महाडिक आक्रमक झाले होते.
धनंजय महाडिक यांनी मंत्री कुषवाह यांना पुरवणी पत्रिकेद्वारे संसद सभागृहात प्रश्न विचारले, तेव्हा कॉँग्रेस, जनता दल, तृणमूल कॉँग्रेससह विरोधी बाकावरील सर्वच खासदारांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला. ‘पढे भारत - बढे भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पुरेशी शिक्षक भरती झाली आहे का, असा प्रश्न महाडिक यांनी उपस्थित केला. देशातील मुलांना मोफत शिक्षणासोबत करोडो रुपये खर्च करून सुविधा दिल्या जातात; पण शाळांना संरक्षक भिंत
बांधण्यास व क्रीडांगण विकसित करण्यास निधी दिला जात नाही, त्यामुळे मुलांची सुरक्षितता धोक्यात येते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी मंत्री कुषवाह यांनी शिक्षकांची कमतरता असल्याचे मान्य करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आणि भविष्य आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खेळांच्या माध्यमातून सशक्त पिढी घडविण्यासाठी सरकार कोणती उपाययोजना आखणार, असा प्रश्न महाडिक यांनी विचारला. त्यावेळी महाडिक यांच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल सभागृहाचे समाधान झाले नाही. त्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. ( प्रतिनिधी )