‘सांसद ग्राम’चे गुजरातमध्ये धडे
By Admin | Updated: April 9, 2015 00:00 IST2015-04-08T23:40:01+5:302015-04-09T00:00:53+5:30
विकास आराखड्यावर प्रशिक्षण : चार्ज आॅफिसरचा समावेश, १६ ते १८ एप्रिलअखेर आयोजन

‘सांसद ग्राम’चे गुजरातमध्ये धडे
भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांचे चार्ज आॅफिसर व तज्ज्ञ यांचे प्रशिक्षण १६ ते १८ एप्रिलअखेर गुजरात येथे होणार आहे. केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे याचे आयोजन केले आहे. ‘सामर्थ्य क्षमता बांधणी’ या नावाने होणाऱ्या प्रशिक्षणात ग्रामविकास आराखड्यासंबंधी धडे दिले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८०, तर गुजरात, गोवा, नगर हवेली, दीव आणि दमण येथील असे एकूण १३६ जण सहभागाी होणार आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ सुरू केली. योजनेंतर्गत जिल्ह्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी पेरीड, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द, राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सोनवडे गाव दत्तक घेतले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले हे सोनवडे गावचे, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी कुणाल खेमनार हे राजगोळी खुर्दचे, तर पन्हाळ्याचे प्रांताधिकारी रवींद्र खाडे हे पेरीडचे चार्ज आॅफिसर आहेत. त्यांच्यासह राज्यातील ६६ चार्ज आॅफिसर व गावपातळीवर प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर निवडलेल्या १४ तज्ज्ञांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासह गुजरात राज्यातील आठ तज्ज्ञ, ३७ चार्ज आॅफिसर, गोव्यामधील २ तज्ज्ञ, ३ चार्ज आॅफिसर, नगर हवेलीतील दोन तज्ज्ञ, एक चार्ज आॅफिसर, दीव आणि दमणमधील दोन तज्ज्ञ आणि एक चार्ज आॅफिसर अशा एकूण १३६ जणांचे गुजरातमधील गांधीनगर येथे दि. १६ पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे.
पहिल्या टप्प्यात उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यांतील तज्ज्ञ आणि चार्ज आॅफिसरांचे ७ ते ९ एप्रिलअखेर उत्तर प्रदेशमध्ये प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कर्नाटक, लक्षद्वीप येथील चार्ज आॅफिसर व तज्ज्ञांचे प्रशिक्षण १५ ते १७ एप्रिलअखेर म्हैसूर येथे होणार आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्यांचे प्रशिक्षण २१ ते २३ एप्रिलअखेर आसाम येथे होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात दत्तक गाव विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
यावर आहे प्रशिक्षण
गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय करायला हवे, विकासकामांचा पाठपुरावा व देखरेख कसे करणे अपेक्षित आहे; केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग वाढविणे, आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामविकास आराखडा झाल्यानंतर गावपातळीवरील सक्रिय ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गुजरातमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणात गावविकास आराखड्यासंबंधित प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकसहभागातून गावपातळीवरील विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांना प्रारंभ होतील.
- एम. एस. घुले,
चार्ज आॅफिसर, सोनवडे