नव्या अशासकीय मंडळासाठी हालचाली
By Admin | Updated: November 10, 2014 00:42 IST2014-11-10T00:34:55+5:302014-11-10T00:42:26+5:30
बाजार समिती : भाजप कार्यकर्त्यांचा पणन मंत्र्यांकडे रेटा; आठ दिवसांसाठी प्रशासक नियुक्तीही शक्य

नव्या अशासकीय मंडळासाठी हालचाली
कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठरावानंतर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर छोटेखानी अशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली भाजप गोटात सुरू आहेत. तोपर्यंत सोमवारी आठ दिवसांसाठी प्रशासक नियुक्त केला जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी मोहन निंबाळकर यांच्यासह जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नावे पुढे येत आहेत.
अशासकीय मंडळाला पणन संचालकांनी स्थगिती दिल्यानंतर बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. डॉ. महेश कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती, त्यामुळे कदम यांचे नाव पुन्हा चर्चेत आले पण कदम यांच्या नावाला काही मंडळींनी विरोध केल्याचे समजते. वरिष्ठ पातळीवरून रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील उपनिबंधक मोहन निंबाळकर यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले. निंबाळकर यांनी आपण प्रशासक म्हणून काम करण्यास नकार दिल्याचे समजते. जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, शहर उपनिबंधक रंजन लाखे, हातकणंगलेचे उपनिबंधक सुनील सिंगतकर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे, पण वरिष्ठांकडून यापैकी एका नावाला हिरवा कंदील मिळालेला नाही.
समितीच्या निवडणुकीसाठी अजून तीन-चार महिन्यांचा कालावधी असल्याने तोपर्यंत अशासकीय मंडळ नियुक्त करावे, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. पाच ते सात जणांचे अशासकीय मंडळ करून त्यांच्या माध्यमातून भाजप-शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असा रेटा कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला आहे. या मागणीवरही पणन विभागात गांभीर्याने विचार सुरू आहे. राज्यातील भाजप सरकार विश्वासदर्शक ठराव संमत व्हायचा असल्याने आताच अशासकीय मंडळाची नियुक्ती नको, तोपर्यंत प्रशासकांची नेमणूक करा, असा ही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर हे आपल्याकडेच पदभार ठेवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
अशासकीय मंडळ न्यायालयात !
पणन संचालकांनी दिलेल्या स्थगितीविरोधात अशासकीय मंडळ उद्या, सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रा. निवास पाटील यांनी सांगितले.
बाजार समितीचा चांगला कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. महेश कदम यांनी आपल्या कारकिर्दीत मनमानी कारभार केल्याने त्यांना आमचा विरोध आहे.
- नंदकुमार वळंजू (माजी संचालक, बाजार समिती)