उदगावात आघाडीत हालचाली, स्वाभिमानीत शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:14+5:302021-02-05T07:02:14+5:30
शुभम गायकवाड : उदगाव उदगावची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या आठ तर स्वाभिमानीच्या नऊ जागा निवडून ...

उदगावात आघाडीत हालचाली, स्वाभिमानीत शांतता
शुभम गायकवाड : उदगाव
उदगावची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या आठ तर स्वाभिमानीच्या नऊ जागा निवडून आल्या. हीच परिस्थिती कायम राहील, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु, निराशेच्या गर्तेत गेलेल्या आघाडीने आमच्याकडे जिल्हा परिषद, मंत्रिपद, खासदारकी आहे. त्यामुळे आम्हीच गावाचा विकास करू शकतो, हा विश्वास दिला व आश्वासनांची खैरात केल्याने स्वाभिमानीकडून निवडून आलेल्या कलीमुन नदाफ यांनी थेट पत्रकार परिषद घेत आघाडीत प्रवेश केल्याने सारे चित्रच पालटले.
निवडणुकीसाठी स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गट अशी आघाडी आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत आघाडीला आठ तर स्वाभिमानीला आठ असा समसमान कौल मतदारांनी दिला. स्वाभिमानीची एक जागा बिनविरोध झाल्याने त्यांच्या पदरात नऊ जागा पडल्या. काठावरच्या बहुमताने स्वाभिमानी सुरुवातीपासूनच अस्वस्थ होती. त्यातच एका सदस्याने प्रवेश केल्याने बालेकिल्ल्यातच खिंडार पडल्याने आघाडीच्या नेत्यांविरुद्ध माजी सभापती सावकर मादनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील यांच्याकडे त्यांनी तसे म्हणणे मांडल्याचे समजते, तर आघाडीकडून समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, बाळासोा कोळी, राजू मगदूम यांनी स्थानिक निवडणुकीत संदर्भ वेगळे आहेत, आम्हाला आमच्या स्तरावर निर्णय घेऊ द्या, अशी थेट भूमिका नेत्यांजवळ व्यक्त केली आहे. दरम्यान, सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर सदस्य सहलीला गेले आहेत.