विधानसभेसाठी हालचाली गतिमान

By Admin | Updated: August 5, 2014 23:39 IST2014-08-05T21:51:40+5:302014-08-05T23:39:05+5:30

काँग्रेसच्या आढावा बैठका : भाजपकडून आघाडीसाठी प्रयत्न

Movements for the Assembly move fast | विधानसभेसाठी हालचाली गतिमान

विधानसभेसाठी हालचाली गतिमान

राजाराम पाटील - इचलकरंजी - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, भाजप व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांकडून राजकीय हालचाली सुरू आहेत. कॉँग्रेस पक्षाकडून वॉर्डनिहाय बैठका घेतल्या जात असून, भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसमधील आवाडे विरोधकांची मोट बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह तिसऱ्या आघाडीत शांतता आहे.
लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रीय कॉँग्रेसला हार पत्करावी लागली. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सुद्धा कॉँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यापेक्षा महायुतीचे खासदार राजू शेट्टी यांना १९,८१२ मताधिक्य मिळाले. त्यामुळे इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीने गेले दोन आठवडे झाले कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या वॉर्डनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची स्थानिक कारणमीमांसा केली जात असून, त्याचा ऊहापोह या बैठकांतून होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवेळी आपापल्या वॉर्डांमध्ये मताधिक्य मिळविण्याविषयी पक्षश्रेष्ठींकडून या बैठकांमध्ये निर्देश दिले जात आहेत.
अशा पार्श्वभूमीवर काल, सोमवारी शहर विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील काही गट, राष्ट्रीय कॉँग्रेसमधील आवाडे विरोधक यांची येथील आमराई मळा येथे बैठक झाली. बैठकीस आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष बादशहा बागवान, ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव, निमंत्रक तानाजी पोवार, सागर चाळके, शिक्षण मंडळाचे उपसभापती नितीन कोकणे, महेश बोहरा, शिवसेनेचे गटनेते महादेव गौड, राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील, सुनील महाजन, उदय बुगड, दीपक ढेरे, नगरसेविका ध्रुवती दळवाई, लक्ष्मी बडे, आक्काताई कोटगी, सारिका धुत्रे, संतोष शेळके, मदन झोरे, शीतल दत्तवाडे, सुरेश भुत्ते, वसंत माळी, दिलीप मुथा, आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये शहर व मतदारसंघातील राजकीय क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना आपल्या प्रमुख भाषणात आमदार हाळवणकर यांनी, विधानसभेसाठी त्यांच्या उमेदवारीला वीज चोरी प्रकरणाचा अडसर ठरणार नाही, अशी ग्वाही दिली. तेव्हा सर्वानुमते आमदार हाळवणकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला.याच बैठकीत हाळवणकर यांनी राष्ट्रवादीचे अशोक स्वामी, मदन कारंडे यांना भेटून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचेही निश्चित करण्यात आले. तसेच आगामी महायुतीच्या सरकारमध्ये शहर विकास आघाडीला शासनाचे महामंडळ मिळविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

एकास एक उमेदवार देण्याचा निर्धार
राज्यात आणि नगरपालिकेत दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादीचे अशोक जांभळे व अशोक स्वामी वगळता अन्य स्थानिक नेते आवाडेंच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे आवाडे यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्धार सर्व विरोधकांचा असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Movements for the Assembly move fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.