नवीन किमानवेतन रद्द होईपर्यंत आंदोलन
By Admin | Updated: September 7, 2015 00:14 IST2015-09-07T00:09:48+5:302015-09-07T00:14:50+5:30
उद्योजक, कारखानदारांचा निर्णय : दावे मागे घेतल्यास सायझिंग सुरू : कोळी

नवीन किमानवेतन रद्द होईपर्यंत आंदोलन
इचलकरंजी : शासनाने जाहीर केलेले यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन आणि महागाई निर्देशांक वस्त्रोद्योगासाठी घातक आहे. म्हणून सुधारित किमानवेतन व महागाई निर्देशांक रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शहरातील उद्योजक व कारखानदारांच्या सभेत व्यक्त करण्यात आला.दरम्यान, कामगार संघटनेचा चालू असलेला संप आणि दाखल केलेले क्लेम अॅप्लिकेशनचे दावे मागे घेईपर्यंत सायझिंग कारखाने बंदच राहतील, अशी घोषणा सायझिंगधारक कृती समितीचे प्रमुख संतोष कोळी यांनी केली.शनिवारी जिल्हाधिकारी अमित सैनी व जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या पुढाकाराने येथील सायझिंग व यंत्रमाग क्षेत्रातील मालक आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील सर्व उद्योजक आणि कारखानदार यांची एक सभा औद्योगिक वसाहतीतील कल्याण केंद्राच्या आवारात सायझिंगधारक कृती समितीने आयोजित केली होती. या सभेत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, माजी अध्यक्ष राजगोंड पाटील, यंत्रमाग जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी शासनाने नवीन जाहीर केलेले किमान वेतन सायझिंग कारखान्यांबरोबर यंत्रमाग उद्योगाशी लागू असल्याचे सांगितले. तसेच ते व्यावहारिकदृष्ट्या न परवडणारे असल्याने आणि अवाजवी दरवाढ करणारा मुंबई महागाई निर्देशांकसुद्धा यंत्रमाग उद्योगास हानीकारक असल्यामुळे तो रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी वसंतराव पाटील, प्रकाश गौड, बंडोपंत लाड, अनिल मगदूम, दिलीप ढोकळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कामगार संघटनांचा दृष्टिकोन टोकाचा
संतोष कोळी यांनी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेवर जोरदार टीका केली. कामगार नेते ए. बी. पाटील यांचा आंदोलनाचा दृष्टिकोन अव्यवहार्य व टोकाचा असल्याने त्यांच्याबरोबर सायझिंग संघटना चर्चा करणार नाही, याचा पुनरुच्चार केला आणि संप बेशर्त मागे घ्यावा व क्लेम अॅप्लिकेशनचे दावे त्वरित रद्द करावेत. त्यानंतरच कामगारांना वेतनवाढ देऊन सायझिंग कारखाने सुरू करू, असेही स्पष्ट केले.