पंचगंगा नदीपात्रात उतरून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:23+5:302021-02-11T04:26:23+5:30
शिरोळ : पंचगंगा नदीप्रदूषणप्रश्नी गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ चर्चाच होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई ...

पंचगंगा नदीपात्रात उतरून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
शिरोळ : पंचगंगा नदीप्रदूषणप्रश्नी गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ चर्चाच होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करा, असे आदेश दिले असतानाही प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी थेट शिरोळ पंचगंगा नदीपात्रात उतरून जल आंदोलन केले. प्रदूषणावरून तहसील कार्यालयात बैठक न घेता नदीकाठावरच बैठक घेण्यास आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला भाग पाडले. यावेळी येत्या चार दिवसांत मृत माशांची विल्हेवाट लावून प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या चार दिवसांपासून नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडत आहेत. असे असतानाही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे, असा आरोप करीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी दोन वाजता शासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रदूषणप्रश्नी ठोस कारवाई होत नसल्याने स्वाभिमानीचे सागर शंभूशेटे, पं. स. उपसभापती सचिन शिंदे, विश्वास बालिघाटे, बंडू पाटील, सुधाकर औरवाडे, राहुल सूर्यवंशी, बंडू उमडाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिरोळमधील पंचगंगा नदीमध्ये उतरून जल आंदोलन सुरू केले.
अखेर प्रांताधिकारी डॉ. खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड, पाटबंधाऱ्याचे संजीवकुमार कोरे, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, गटविकास अधिकारी शंकर कवितके, आदींनी थेट नदीकाठावर जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नदी प्रदूषणमुक्त करावी, बरगे काढावेत, प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी पाटबंधारे व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत गंभीर दखल घेण्याबाबतच्या सूचना दिल्या.
चौकट - दर महिन्याला बैठक
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर आहे, हे आंदोलनकर्त्यांनी बुधवारी प्रशासनाला नदीपात्राच्या ठिकाणी पाहण्यास भाग पाडले. त्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या दहा तारखेला प्रदूषण मंडळ, पाटबंधारे, उद्योग यांच्यासह लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी यावेळी दिले.
फोटो - १००२२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथे पंचगंगा नदीपात्रात उतरून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.