विषय समित्यांसाठी हालचाली
By Admin | Updated: December 11, 2014 00:33 IST2014-12-11T00:12:25+5:302014-12-11T00:33:24+5:30
इचलकरंजी नगरपालिका : इच्छुक नगरसेवकांची फिल्डिंग; २२ डिसेंबरला निवडणूक

विषय समित्यांसाठी हालचाली
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी घोषित केला आहे. समित्यांच्या निवडणुका २२ डिसेंबरला होणाऱ्या विशेष सभेमध्ये होणार आहेत. नगरपालिकेत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशा दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेत आहे. तर मागील आठवड्यापासूनच समित्यांच्या सभापतिपदासाठी वर्णी लागावी म्हणून इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
इचलकरंजी नगरपालिकेकडे असलेल्या पाच विविध विषय समित्यांपैकी तीन समित्या कॉँग्रेस पक्षाकडे, तर दोन समित्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आहेत. कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, महिला व बालकल्याण या समित्या असून, राष्ट्रवादीकडे बांधकाम आणि शिक्षण-क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती आहे. यापैकी पाणीपुरवठा व बांधकाम या दोन्ही समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने या दोन समित्यांकडे सभापती म्हणून आपलीच वर्णी लागावी, यासाठी दोन्हींकडील नगरसेवकांच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. सोमवारी (दि. २२) निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असून, या निवडणुकीसाठी होणाऱ्या विशेष सभेच्या अध्यक्षपदी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे आहेत. नगरपालिकेतील पक्षनिहाय नगरसेवकांच्या संख्येनुसार मिळालेल्या कोट्याप्रमाणे संबंधित पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी या समित्यांच्या सदस्यांची नावे मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे द्यावयाची आहेत. त्यानंतर दुपारी २ ते ३ या वेळेत समित्यांच्या सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी होऊन उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्धा तास देण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास चार वाजता होणाऱ्या विशेष सभेत समित्यांची निवड जाहीर केली जाईल.
विविध समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसमध्ये असलेली आघाडी संपुष्टात यावी, यासाठी राष्ट्रीय कॉँग्रेसचे काही नगरसेवक हालचाली करीत होते. त्याला पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आघाडीत बिघाडी होण्याच्या हालचालीसुद्धा थंडावल्या आहेत. त्यामुळे येणारी समित्यांची निवडणूक सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येक समितीत १९ सदस्य
इचलकरंजी नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ५७ आहे. त्यामुळे विविध विषय समित्यांमध्ये १९ सदस्य असतील. एका सदस्याला जास्तीत जास्त तीन समित्यांवर सदस्यत्व देता येईल. संख्या बलाबलानुसार समित्यांमध्ये कॉँग्रेसचे ११, राष्ट्रवादीचे २ व शहर विकास आघाडीचे ६ सदस्य असतील.