समाजातील नवसमस्यांच्या मुद्द्यांवर चळवळी उभ्या राहतात : भारती पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:17 IST2017-09-23T17:09:45+5:302017-09-23T17:17:40+5:30
१९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले.

समाजातील नवसमस्यांच्या मुद्द्यांवर चळवळी उभ्या राहतात : भारती पाटील
कोल्हापूर : देश व विदेशांत आज नवनव्या चळवळी निर्माण होत आहेत. जगभरातील या चळवळींना बराच मोठा इतिहास आहे. पूर्वी या सामाजिक चळवळी आर्थिक संसाधनांच्या मागण्यांसाठी निगडित होत्या; परंतु १९८०-९० च्या दशकानंतरच्या चळवळींतील मागण्या या खास करून सरकारला जबाबदार व पारदर्शक बनविण्यास भाग पाडण्यासाठी निर्माण झाल्या आहेत. समाजातील या चळवळी नवसमस्यांच्या मुद्द्यांवर निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी केले.
विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र व इतिहास विभागात आयोजित ‘मानवविद्या व विज्ञानातील सद्य:स्थितीतील चळवळीचे नवे प्रवाह’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय विद्याशाखीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे होत्या.
पाटील म्हणाले, देशात नर्मदा बचाव, भ्रष्टाचारमुक्त भारत, निर्भया अशा चळवळींपासून फेरीवाले, अंगणवाडी शिक्षिका व दलित आदिवासी चळवळींचे प्रश्नही पुढे येत आहेत. या चळवळी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, समाज संघटन करतात व चळवळीचा एक नवा विषय, विचार लोकांच्या मनात पेरून जातात, म्हणून या चळवळींना महत्त्व आहे.
डॉ. एस. आर. कट्टीमणी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. प्रा. एस. ए. फराकटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्राचे प्रमुख समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. ए. पवार यांनी काम पाहिले.
चर्चासत्राचे समन्वयक व इतिहास विभागप्रमुख डॉ. एस. एम. घोरपडे यांनी मानले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देश-विदेशांतील संशोधकांनी लिहिलेल्या ‘आयुषी’ आंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विदेशातील अभ्यासक रोनाल्डो बिटुका यांनी आपले सामाजिक चळवळीविषयीचे विचार व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी फिलिक्स माकोरी आसान्दा, फ्रिडा मोरा ओम्वेंगा, एस्थर केरुलो ओएंगा, मोझेझ न्योरोबो न्यामोंगो, आयवी नोनुके हे विदेशांतील अभ्यासक उपस्थित होते. देशातील व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शोधनिबंध वाचन, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.