रस्ता विस्तारीकरण नियमांनुसार न केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:01+5:302021-02-11T04:26:01+5:30
गारगोटी : गारगोटी ते पाटगाव या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यावर्षी तो पूर्ण होईल. या रस्त्याचे काम ...

रस्ता विस्तारीकरण नियमांनुसार न केल्यास आंदोलन
गारगोटी : गारगोटी ते पाटगाव या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यावर्षी तो पूर्ण होईल. या रस्त्याचे काम अगदी योग्यरितीने होते पण शासकीय नियमांनुसार या रस्त्याचे काम ठेकेदाराने न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे संभाजी ब्रिगेड भुदरगडच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. कोकणाला जोडणारा गारगोटी-शिवडाव या रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा रस्ता १२ मीटर रूंदीने होणे अपेक्षित असताना काही गावांमध्ये ग्रामस्थांची रस्ता अधिक रूंद होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातून रस्त्याच्या कडेला अनेक वर्षांपासून छोटे व्यावसाय करणाऱ्या लोकांच्या पोटावर पाय येण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे आज संभाजी ब्रिगेड भुदरगडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम शासनाच्या नियमांनुसार व्हावे तसेच काम नियमबाह्य केल्यास तीव्र आंदोलन करणार अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अश्विनी आडसुळे यांना दिले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मागणी ऐकून घेतली व संबंधित यंत्रणेला योग्य ते आदेश देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सुधाकर देसाई, तालुकाध्यक्ष मानसिंग देसाई, भीमराव देसाई, स्वप्निल सुपल, सुनील देसाई,बंटी यादव उपस्थित होते.