उद्या सर्व शाळा बंद ‘शैक्षणिक व्यासपीठा’चे आंदोलन
By Admin | Updated: January 19, 2017 00:49 IST2017-01-19T00:49:08+5:302017-01-19T00:49:08+5:30
जिल्ह्णातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे दोन हजार शाळा बंद

उद्या सर्व शाळा बंद ‘शैक्षणिक व्यासपीठा’चे आंदोलन
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने पुकारलेल्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बुधवारी शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम केले. आंदोलनातील पुढील टप्प्यामध्ये उद्या, शुक्रवारी जिल्ह्णातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे दोन हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारी, निमसरकारी व शिक्षक समन्वय समितीने पुकारलेल्या १८ ते २० जानेवारीच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घेतला होता. मात्र, सातवा वेतन आयोग दि. १ जानेवारी २०१६ पासून देण्याचे मान्य करून त्याबाबत राज्य सरकारने समिती स्थापन करणे; तसेच अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही मंगळवारी (दि. १७) दिल्याने सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे राज्यव्यापी संपास स्थगिती देण्यात आली. मात्र, शिक्षकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे शैक्षणिक व्यासपीठाने प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या, शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशीचे कामकाज अन्य सुटीच्या दिवशी भरून काढले जाणार आहे.
सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे. मात्र अजूनही शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्यातर्फे उद्या, शुक्रवारी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. -एस. डी. लाड, सभाध्यक्ष,
शैक्षणिक व्यासपीठ
असे होणार आंदोलन...
आज, गुरुवारी शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. उद्या, शुक्रवारी जिल्ह्यात खासगी प्राथ. व माध्य. सर्व शाळा तसेच जि.प. व महापालिकेतील शिक्षक समितीला मानणाऱ््या सर्व शाळा सहभागी होणार आहेत. २५ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होत आहेत. कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील संपकरी ११ ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर धरणे व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.