‘वारणा’च्या विरोधात आंदोलन
By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-20T23:07:44+5:302015-01-21T23:53:13+5:30
नवे पारगावात रास्ता रोको : ऊसदर जाहीर करण्याची 'स्वाभिमानी'ची मागणी

‘वारणा’च्या विरोधात आंदोलन
नवे पारगाव : तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर जाहीर न केल्याने तसेच चौदा दिवसांत ऊसतोड झालेली बिले जमा न केल्याने ‘वारणे’च्या संचालकांवर फौजदारी दाखल करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे आज, मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. तत्काळ निर्णय न झाल्यास ‘वारणावर हल्लाबोल’ आंदोलनाचा इशारा ‘स्वाभिमानी’ने यावेळी दिला. पेठवडगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. प्रशासनाच्यावतीने वाठारचे मंडल अधिकारी अरुण कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
येथील महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ वारणानगर-वाठार रस्त्यावर रास्ता रोको केला. हातात ऊस, निषेधाचे फलक व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांची रांग लागली. वडगाव पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.
आंदोलनस्थळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, एकेकाळी उच्चांकी गाळप व दर देणाऱ्या ‘वारणा’ने सध्या उच्चांकी गाळप व नीचांकी दर दिल्याने शेतकऱ्यांची विश्वासार्हता गमावली आहे. वैभव कांबळे म्हणाले, ऊस उत्पादकांची ‘वारणा’ने फसवणूक करून शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचे काम केले आहे.
स्वाभिमानीच्यावतीने साखर सहसंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखाना सुरू होऊन दोन महिने झाले तरीही ‘वारणा’ने शुगर केन कंट्रोल कायद्यानुसार तोडणीनंतर १४ दिवसांनंतर ऊस बिल दिले नाही. एफ.आर.पी.नुसार दर जाहीर केला नाही. ७ जानेवारीस निवेदन देऊनही ‘वारणा’चे संचालक मंडळ बेफिकीर आहे. त्यामुळे संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
यावेळी वैभव कांबळे, शिवाजी माने, महावीर पाटील, विलासराव पाटील, किरण पाटील, संपतराव पोवार, शिवाजी शिंदे, अरुण मगदूम, सुरेश पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस उपअधीक्षक प्रकाश घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)