खणदाळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या
By Admin | Updated: September 11, 2014 00:38 IST2014-09-11T00:33:43+5:302014-09-11T00:38:01+5:30
आत्महत्येचे कारण अस्पष्ट

खणदाळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या
नूल : गणेशोत्सवासाठी माहेरी आलेल्या महिलने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लता संजय इदरगुच्ची (वय २५, रा. हत्तरगी, ता. हुक्केरी) असे महिलेचे नाव आहे. मुलगा विवेक (३) व मुलगी वैष्णवी (दीड वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे आज, बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.खणदाळ येथील शंकर दुंडाप्पा न्हावी यांना सविता, गीता, लता या तीन मुली व संदीप हा मुलगा आहे. गीता व लता या जुळ्या बहिणी. यांतील लताचा विवाह हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील संजय आप्पासाहेब इदरगुच्ची यांच्याशी २००९ मध्ये झाला होता. संजय याचे अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे सलूनचे दुकान असल्याने ते मुलांसह अरळगुंडी येथे राहत होते. जानेवारी २०१४ मध्ये अरळगुंडीतील दुकान बंद करून ते गावी हत्तरगीला राहण्यासाठी गेले व तेथे सलूनचे दुकान सुरू केले. ते सासरी सासू, पती, पत्नी मुलांसह वास्तव्यास होते; तर सासरे आप्पासाहेब हे बेळगाव येथे दुसऱ्या पत्नीसह स्थायिक झाले आहेत. लताचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. ती अत्यंत सुस्वभावी होती. विवेक हा कर्णबधिर होता.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
लता ही गणेशोत्सवासाठी आठ दिवसांपूर्वी माहेरी खणदाळ येथे आली होती. मात्र, सोमवारी (दि. ८) सायंकाळपासून ती मुलांसह घरातून बेपत्ता झाली. सासरी व नातेवाइकांकडे शोधाशोध केली असता ती सापडली नाही. आज दुपारी घराशेजारील विहिरीत तिच्या वैष्णवी या मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला. मुलगा विवेक व लताचाही मृतदेह सापडल्याने तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.