पोलीस स्टेशनमध्येच जावयाकडूनच सासूवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:29 IST2021-09-15T04:29:26+5:302021-09-15T04:29:26+5:30
कोल्हापूर : आपल्याला वारंवार त्रास देत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या सासूवरच जावयाने शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना चक्क शाहुपुरी ...

पोलीस स्टेशनमध्येच जावयाकडूनच सासूवर हल्ला
कोल्हापूर : आपल्याला वारंवार त्रास देत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या सासूवरच जावयाने शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना चक्क शाहुपुरी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात मंगळवारी सकाळी घडली. या हल्ल्यात सासू विद्या सीताराम सितम (वय ४० रा.कदमवाडी) या जखमी झाल्या. पोलीस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आपला जावई सुनील परशुमराम हळदे (वय २६ रा.कदमवाडी) हा आपल्याला वारंवार त्रास देत असल्याने, त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सासू विद्या सितम या शाहुपुरी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्या तक्रार देण्यासाठी आल्याने पाठोपाठ जावई सुनील हळदे हाही पोलीस ठाण्यात आला. यावेळी ठाणे अंमलदार कक्षातच पोलिसांकडून चौकशी सुरू होती, दोन्हीही बाजू ऐकून घेत होते. त्यावेळी सासू व जावई यांच्यात वाद वाढत गेला. जावयाने सासूला शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या डोक्यात मारले. त्यावेळी जावयाच्या हातातील चांदीचे कडे लागल्याने सासू सितम या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने काही वेळ खळबळ उडाली. याबाबत जावई सुनील हळदे याच्याविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.