मोस्ट वॉंटेड गुन्हेगार आप्पा माने कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:29+5:302021-03-26T04:23:29+5:30
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथील सुमारे २० गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला ट्रिपल मोका कारवाईतील कुख्यात ...

मोस्ट वॉंटेड गुन्हेगार आप्पा माने कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथील सुमारे २० गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला ट्रिपल मोका कारवाईतील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष ज्ञानदेव माने (वय ३२ रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला साथीदारासह पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर (३० रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक साथीदाराचे नाव आहे. दोघा संशयितांच्याकडे कमरेला राऊंडसह लोड असलेले दोन पिस्टल, २० जिवंत राऊंड आदी शस्त्रसाठा तसेच दुचाकी जप्त केली. आरोपींवर विविध पोलिसांत दरोडा, रॉबरी, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बुधवारी सायंकाळी संशयित दोघेही दुचाकीवरून गडहिंग्लजहून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ परिसरात आले, तेथे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने तसेच राखीव पोलीस दलाच्या मदतीने नियोजनबद्ध कारवाई केली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयितांनी कोल्हापुरात येण्यापूर्वी यमकरगट्टी येथेही (जि. बेळगाव, कर्नाटक) ज्वेलरी दुकानाची दरोड्याबाबत रेकी केल्याचेही उघड झाले.
कोल्हापुरात जोतिबा दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे सोन्याचे दागिने लुटल्याचे त्याच्यासह चौघांवर कोडोली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलीस वेशांतर अन् पुणे ग्रामीण पोलिसांवर फायरिंग
नोव्हेबर २०२० मध्ये आरोपी आप्पा माने व पप्पू सोनवलकर यांनी साथीदारासह पोलीस वेशांतर करून राजगड पोलिसांच्या हद्दीत फायरिंग करून बालाजी ज्वेलर्सवर दरोडा टाकून १७ तोळे दागिने लुटले. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पुणे ग्रामीण पोलिसावरही फायरिंग करून ते पळून गेले होते. त्यानंतर गेले सहा महिने पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या मागावर होते.
आप्पावर २० तर पप्पूवर ५ गंभीर गुन्हे
आप्पा माने याच्यावर कोडोलीत तीन, राजारामपुरी (कोल्हापूर), हिंजवडीत दोन (पुणे शहर), जेजुरी, वडगाव निंबाळकर, राजगड (पुणे ग्रामीण), माळशिरसमध्ये दोन, नातेपोते पोलीस, मोहोळ (सोलापूर ग्रामीण), उंब्रज, कराड, बोरगाव, दहिवडी पोलीस, फलटण (सातारा) तसेच कळंब (उस्मानाबाद), खारगर (नवी मुंबई) असे एकूण २० गुन्हे आहेत. यापैकी कोडोली, राजगड व खारगर गुन्ह्यात त्याच्यावर मोका कारवाई झाली, तो सहा गुन्ह्यात फरारी होता. पप्पू सोनवलकर याच्यावर राजारामपुरीसह (कोल्हापूर), राजगड, जेजुरी, वडगाव निंबाळकर पोलीस (पुणे ग्रामीण), फलटण (सातारा) असे पाच ठिकाणी गुन्हे आहेत. याच्यावर राजगड पोलीस हद्दीत मोका कारवाईचा गुन्हा आहे.
पोलिसांना २५ हजाराचे बक्षीस जाहीर
धाडशी कारवाई केल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास व राखीव पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पथकाला २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले. तसेच पोलीस महासंचालकांच्याकडेही बक्षीससाठी शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो नं. २५०३२०२१-कोल-कोल्हापूर क्राईम०१
ओळ : गंभीर गुन्ह्यातील अटक केलेला आप्पा माने व पप्पू सोनवलकर या आरोपींकडून पोलिसांनी जप्त केलेले पिस्टल व राऊंड भरलेले मॅगजीन.
फोटो नं. २५०३२०२१-कोल-कोल्हापूर क्राईम०२
ओळ : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथे गंभीर गुन्ह्यातील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष माने व पप्पू उर्फ सुहास सोनवलकर यांना कोल्हापुरात अटक केली.