अनुष्काला दोन लाखांहून अधिक मदत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:00+5:302021-08-20T04:29:00+5:30
डोळ्यावरील शस्त्रक्रियाही होणार मोफत मुरगूड : ट्युमरमुळे डोळाच काढून टाकलेल्या मुरगूड (ता.कागल) मध्ये आपल्या आजीकडे राहणाऱ्या दोन वर्षे ...

अनुष्काला दोन लाखांहून अधिक मदत जमा
डोळ्यावरील शस्त्रक्रियाही होणार मोफत
मुरगूड : ट्युमरमुळे डोळाच काढून टाकलेल्या मुरगूड (ता.कागल) मध्ये आपल्या आजीकडे राहणाऱ्या दोन वर्षे वयाच्या अनुष्का विनोद तोरसे हिला समाजातील दानशूर लोकांनी मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत दोन लाख रुपये आर्थिक मदत जमा झाली असून तिचा विद्रुप चेहरा चांगला करण्यासाठी मुंबईमध्ये होणारी शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्ताच्या प्रभावाने अनुष्काचे हसू परत आणण्यासाठी अनेकजण झटत आहेत.
महिन्यांपूर्वी 'तुम्हीच परत आणू शकता अनुष्काच्या चेहऱ्यावरील हास्य' या लोकमतमध्ये आलेल्या बातमीने समाजमन अस्वस्थ झाले. अगदी वृत्त प्रसिद्ध झालेल्या दिवसांपासून ऑनलाईन मदतीचा ओघ सुरू झाला. शंभर रुपयांपासून अगदी दहा हजार रुपयेपर्यंत अनेक दानशूर लोकांनी अनुष्काच्या आईच्या बँक खात्यावर मदत पाठवली आहे. यात कोल्हापूर शहरातील एका सद्गृहस्थाने दहा हजार मदत देऊन अनुष्काला मुंबईमध्ये नेऊन उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे.
मुरगूडमधील शंभूराजे राजू आमते या चिमुरड्याने आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून सुमारे दहा हजार आर्थिक मदत अनुष्का कडे सुपूर्द केली आहे. अनुष्काचे मूळ गाव खडकेवाडा येथेही अनेक तरुणांनी घरोघरी फिरून आर्थिक मदत गोळा केली, तसेच काहींनी अन्नधान्य रूपात वेगवेगळे साहित्य जमा केले. गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन मुरगूडमध्ये येऊन हे सर्व साहित्य अनुष्काच्या आई व आजीकडे सुपूर्द केले. भविष्यातही मदतीचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सध्या अनुष्कावर कोल्हापुरातील ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते त्या रुग्णालयाच्या प्रशासनाने या बातमीची दखल घेत येथून पुढचे सर्व उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अनुष्काच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगून डोळा काढल्याने सध्या जो चेहरा विद्रुप दिसतो तो कृत्रिम डोळा बसवून मूळ स्वरूपात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईमध्ये या चिमुरडीवर मुश्रीफ यांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अनुष्काला उपचार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे पंधरा लाख खर्च अपेक्षित असल्याने अजूनही मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी अजूनही अनुष्काला मदत करणे अपेक्षित आहे.
फोटो ओळ :-
मुरगूड (ता. कागल) येथील शंभूराजे राजेंद्र आमते या चिमुरड्याने आपला वाढदिवस रद्द करून अनुष्काला सुमारे दहा हजार रुपये आर्थिक मदत देऊ केली. यावेळी सोबत राजेंद्र आमते व अनुष्काची आई व आजी.