गांधीनगरच्या पोलीस कोठडीत क्षमतेपेक्षा अधिक आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:42 IST2021-03-13T04:42:35+5:302021-03-13T04:42:35+5:30
बाबासाहेब नेर्ले लोकमत न्यूज नेटवर्क गांधीनगर : गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीची क्षमता केवळ चार असताना या कोठडीत क्षमतेपेक्षा ...

गांधीनगरच्या पोलीस कोठडीत क्षमतेपेक्षा अधिक आरोपी
बाबासाहेब नेर्ले
लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीची क्षमता केवळ चार असताना या कोठडीत क्षमतेपेक्षा अधिक आरोपी ठेवले जात असल्याने येथील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या करवीर पोलीस स्थानक, गोकुळ शिरगाव, शिरोली पोलीस ठाण्यातील अटकेत असलेल्या आरोपींना गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले जात आहे. संबंधित तीनही पोलीस ठाण्यांमध्ये रात्री आरोपी ठेवण्याची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथील आरोपी गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येतात. गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीची क्षमता चार आरोपी ठेवण्याची असताना तिथे क्षमतेपेक्षा अधिक आरोपी ठेवले जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. करवीर, गोकुळ शिरगाव, शिरोली, गांधीनगर या संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींना गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत आश्रयाला आणावे लागत आहे. किरकोळ गुन्ह्यापासून ते गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना ने-आण करणे सुरक्षेच्या दृष्टीने जिकरीचे आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात कोठडी असणे आवश्यक आहे. परंतु, करवीर उपविभागीय विभागातील चार पोलीस ठाण्यांच्या आरोपींची धुरा गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीला सांभाळावी लागत आहे. चार आरोपींची क्षमता असणाऱ्या गांधीनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत आरोपींची संख्या वाढत गेली तर भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच जिल्हा पोलीस प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून प्रत्येक पोलीस ठाण्यात वैयक्तिक कोठडी निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.
कोट :
गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या अद्ययावत इमारतीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील आरोपींच्या स्वतंत्र कोठडीचा प्रश्न मार्गी लागेल.
- सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे.
कोट : शिरोली पोलीस ठाण्यात लाॅकअप गरजेचे आहे. परंतु, शिरोली पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये सुरक्षित जागेअभावी अडचण निर्माण होत असल्याने तसेच आरोपींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्हाला आरोपी सुरक्षित असणाऱ्या अन्य कोठडीत ठेवावे लागत आहेत.
- किरण भोसले, सपोनि, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे.
कोट : करवीर पोलीस ठाण्यातील संशयित आरोपी हे गांधीनगर, मुरगूड किंवा राजारामपुरी येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीची क्षमता पाहून वरिष्ठांच्या आदेशाने त्याठिकाणी ठेवले जातात. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या कोठडीत क्षमतेपेक्षा जास्त आरोपी ठेवले जात नाहीत.
- संदीप कोळेकर, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे.