२४५४ हेक्टरमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक हानी
By Admin | Updated: March 17, 2015 00:10 IST2015-03-16T23:36:50+5:302015-03-17T00:10:02+5:30
शासकीय पंचनामे : २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंतचे पंचनामे पूर्ण; १८ हजार हेक्टरवरील क्षेत्रात कमी नुकसान

२४५४ हेक्टरमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक हानी
सांगली : जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने याचा रब्बी पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधित झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून २१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेले बाधित क्षेत्र १८४१८.२७ हेक्टर असून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र २४५४.५९ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान द्राक्षे आणि ज्वारी पिकाचे झाले आहे. आतापर्यंत चार महिन्यात पाचवेळा फेरपंचनामे करण्यात आले आहेत. शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून संततधार पावसास प्रारंभ झाला होता. रात्रभर पावसाने मुक्काम ठोकल्याने जिल्ह्यातील शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. दि. १ मार्चला देखील दिवसभर पाऊस होता. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांना फटका बसला होता. त्याचप्रमाणे द्राक्ष पिकाचेही नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तेथील पाहणी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी दोन दिवसातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. अवकाळीमुळे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांमध्ये ज्वारी पिकाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. मिरज तालुक्यात (३०४.७७ हेक्टर), तासगाव (७१.०८), कवठेमहांकाळ (४५.५५), खानापूर (६८.२०), पलूस (२३.२१), वाळवा (२३.०७ हेक्टर) एवढे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्यांमध्ये देखील ज्वारी पिकालाच फटका बसला आहे. तासगाव तालुक्यात (११६१.६२ हेक्टर), कवठेमहांकाळ (१३३.३४), जत (८३६६.५१), आटपाडी (१७१.१६), खानापूर (४१), पलूस (३१.८६), वाळवा (१७२.०६) आणि शिराळा तालुक्यात (५.३५ हेक्टर) एवढे नुकसान झाले आहे. ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे : गहू (४५०.६४ हेक्टर), हरभरा (३७३.६३), आंबा (२१.८८), डाळिंब (२६.८० हेक्टर). त्याचबरोबरीने द्राक्षाचे देखील अपरिमित नुकसान झाले आहे. ५० टक्केवरील बाधित क्षेत्रात मिरज तालुक्यातील (३३१.३५ हेक्टर), तासगाव (९२२.०४), कवठेमहांकाळ (१२०.६५), खानापूर (६५९.२५), पलूस (३७०.७८), कडेगाव (२०) आणि वाळवा तालुक्यातील (३०.५२ हेक्टर) क्षेत्राचा समावेश आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात बेदाण्याचे २८७0 मेट्रिक टन नुकसान जिल्ह्यातील २८७०.३३ मेट्रिक टन बेदाण्याचेही नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची आकडेवारी पाहिल्यास, ५० टक्केच्या आतील बाधित क्षेत्रावरील नुकसान अधिक आहे. परंतु ५० टक्केवरील नुकसान झालेल्यांनाच शासकीय मदत मिळण्याची शक्यता आहे. अवकाळीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे झाले असले तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार? हाच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ४जिल्ह्यातील ५० टक्केवरील बाधित क्षेत्रामध्ये गहू पिकाचे (४५०.६४ हेक्टर), हरभरा (३७३.६३), मका (३.१०), भाजीपाला (११) आंबा (२१.८८), पेरु (०.३५), पपई (०.३०), केळी (०.६०), तर २६.८० हेक्टर क्षेत्रामधील डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.