नांदणी आरोग्य केंद्रावर शिरढोणकरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:16+5:302021-07-04T04:17:16+5:30
कुरुंदवाड : कोविड लसीकरण वाटपाबाबत नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पक्षपातीपणा झाल्याच्या निषेधार्थ शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य व ...

नांदणी आरोग्य केंद्रावर शिरढोणकरांचा मोर्चा
कुरुंदवाड : कोविड लसीकरण वाटपाबाबत नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पक्षपातीपणा झाल्याच्या निषेधार्थ शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले. आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरल्याने आंदोलक व अधिकारी यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीतून तणाव निर्माण झाला होता. सुमारे अडीच तासांहून अधिक काळ आंदोलन करण्यात आले.
अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांची समजूत काढत लस उपलब्ध होताच शिरढोणला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले व त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे, ग्रा.पं. सदस्य भास्कर कुंभार यांनी केले.
नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरढोणसह इतर सहा गावांचा समावेश आहे. कोविड लसीकरण वाटपाबाबत शिरढोणला पक्षपातीपणा केल्याने केवळ ४६ टक्के लसीकरण झाले आहे. इतर गावांची टक्केवारी पाहता मोठा फरक दिसून आल्याने सदस्य व ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पूजा अस्वले यांना जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अधिकारी आणि आंदोलकांत शाब्दिक वादावादी झाली.
अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी दातार यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलक शांत झाले. आंदोलनात ग्रा.पं. सदस्य शहाबुद्दीन टाकवडे, नागेश कोळी, शक्ती पाटील, शाहीर बाणदार, हैदअरली मुजावर, रावसाहेब बिरोजे, रणजित यादव, अरिहंत कापसे, पंकज कुंभार सहभागी झाले होते.