कोल्हापुरात आज सैन्यभरती इच्छुकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:22+5:302021-09-17T04:30:22+5:30
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार मोर्चात सहभागी होणार आहेत. दसरा ...

कोल्हापुरात आज सैन्यभरती इच्छुकांचा मोर्चा
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार मोर्चात सहभागी होणार आहेत. दसरा चौकात सकाळी ११ वाजता मोर्चासाठी तरुण एकत्र येणार आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड हे तालुके दुर्गम भागात आहेत. या तीनही तालुक्यांत कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे येथील तरुणांना कोल्हापूर, बेळगाव, कागल, गोवा, पुणे व मुंबई याठिकाणी रोजगाराच्या संधी शोधाव्या लागतात. त्यामुळे येथील युवकांचा सैन्य भरतीकडे मोठा कल आहे.
सध्या अनेक तरुण भरतीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेऊन सराव करीत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, असे तरुण स्वत:च दैनंदिन मेहनत घेऊन सैन्यात दाखल होण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे भरती बंद असल्यामुळे अनेक तरुणांची मनस्थितीही ढासळत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित भरती प्रक्रिया राबवावी आणि वयाची अट शिथिल करावी, अशा मागण्या आहेत.