तासगावात गेला मुरूम कुणीकडे!
By Admin | Updated: November 28, 2015 00:18 IST2015-11-27T23:40:06+5:302015-11-28T00:18:53+5:30
नगरपालिका सभा : शिवरायांच्या पुतळ्याचे काय?, अजय पवार यांचा आरोप

तासगावात गेला मुरूम कुणीकडे!
तासगाव : शहराच्या अनेक भागात पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी १००० ब्रास मुरूमाचे टेंडर मी नगराध्यक्ष असताना काढले होते. मात्र या टेंडरमधील मुरूम तासगाव शहरातील खड्ड्यांत पडलाच नाही. हा मुरूम कुठे गेला, हे शोधण्याची गरज आहे. या मुरूम प्रकरणात गडबड झाली आहे. त्याची चौकशी करा. शिवरायांच्या गुरूवार पेठेतील पुतळ्याच्या कामाला गती यावी, अशी मागणी अजय पवार यांनी नगरपालिका सर्वसाधारण सभेत केली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगरपालिका सभागृहात पालिकेच्या सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुशिला साळुंखे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, उपनगराध्यक्ष सुरेश थोरात उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीस नगरसेवक बाबासाहेब पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव जाफर मुजावर यांनी मांडला. त्यास अविनाश पाटील यांनी अनुमोदन दिले.
सभागृहात विषयांचे वाचन सुरु असताना काँग्रेसचे नगरसेवक अजय पवार यांनी, तासगावातील खड्ड्यांत मुरूम पावसाळ्यात पडलाच नाही. मी नगराध्यक्ष असताना पावसाळ्यात तासगाव शहरातील खड्डे भरण्यासाठी १००० ब्रासच्या मुरुमाच्या टेंडरला मंजुरी दिली होती. मात्र गेले २ महिने हा मुरूम खड्ड्यांत पडलाच नाही. तो गेला कुणीकडे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मुरूमात गोलमाल झाला आहे, चौकशी करा, अशी मागणी त्यांनी अध्यक्ष साळुंखे यांच्याकडे केली. यावर माहिती घेऊन टेंडर असेल तर टाकू, असे साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी पवार यांनी, शिवरायांच्या पुतळ्याचे काम कुठेपर्यंत आले आहे, याची सभागृहास माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावर नगरसेवक बाबासाहेब पाटील यांनी, पोलीस स्टेशन व बांधकाम विभागाची मंजुरी लवकरच घेऊन या कामास गती देणार आहे. पुढील आठवड्यात याच्या पाहणीसाठी आर्किटेक्ट व शिल्पकार येणार असल्याची माहिती दिली. पवार यांनी, तहसील कार्यालयासमोरील जलतरण तलावाचे उद्घाटन करुन तासगावकरांसाठी तो खुला करावा, तसेच पोहायला गेल्यावर त्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यावर चर्चेची मागणी त्यांनी केली.
यावर बाबासाहेब पाटील यांनी, या तलावाचा विषय नगरपालिकेच्या हातात राहिलेला नाही. जिल्हा क्रीडा समितीच्या अखत्यारीतला हा विषय आहे आणि त्याच्या अध्यक्षा आ. सुमनताई पाटील आहेत. त्यांनीच लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक शिस्तीसाठी क्रेन खरेदी करुन वाहतुकीस शिस्त लावावी, अध्यक्षांच्या केबिनमध्ये शिवरायांचा लहान पुतळा खरेदी करावा, कासार गल्लीत बांधलेली व्यायामशाळा एखाद्या संस्थेस भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावी, पालिकेस नवीन चारचाकी वाहन खरेदी करावे, अशा आठ विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, जाफर मुजावर, अजय पवार, शरद मानकर, शैलेश हिंंगमिरे, अनिल कुते, शिल्पा धोत्रे, रजनीगंधा लंगडे, विजया जामदार, शुभांगी साळुंखे, सारिका कांबळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
चौकशीची मागणी : गोलमाल झाल्याचा आरोप
सभेत काँग्रेसचे नगरसेवक अजय पवार यांनी तासगावातील खड्ड्यांत मुरूम पावसाळ्यात पडलाच नाही. मी नगराध्यक्ष असताना पावसाळ्यात शहरातील खड्डे भरण्यासाठी मुरुमाच्या टेंडरला मंजुरी दिली होती. मात्र गेले २ महिने हा मुरूम खड्ड्यांत का पडला नाही? असा प्रश्न उपस्थित केला. या मुरूमात गोलमाल झाला आहे, चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.