मुरगूड नगरपालिका निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत
By Admin | Updated: October 5, 2016 00:38 IST2016-10-05T00:14:24+5:302016-10-05T00:38:27+5:30
पाटील गटाची भूमिका महत्त्वाची : मुश्रीफ-मंडलिक एकत्र येण्याचे संकेत; एकत्रित सत्ता स्थापन्याच्या हालचाली

मुरगूड नगरपालिका निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत
अनिल पाटील -- मुरगूड -गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. दुभंगलेल्या कार्यकर्त्यांची मनेही जुळू लागली असल्याने भविष्यात मुश्रीफ-मंडलिक सर्वच निवडणुकीत एकत्रच राहतील, असा सूर उमटत आहे. त्यामुळे आगामी मुरगूड नगरपालिका निवडणुकीमध्येही हाच विचाराचा धागा घट्ट विणण्याचा प्रयत्न होण्याचे वृत्त आहे. मुरगूडमधील रणजितसिंह व प्रवीणसिंह पाटील हे दोन बंधू कागलच्या राजकारणात मुश्रीफ यांचेच नेतृत्व मानतात. त्यामुळे या दोन बंधंूना घेऊन मुरगूड पालिका बिनविरोध करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो,’ या उक्तीप्रमाणे मुश्रीफ आणि मंडलिक गटांतील काही कार्यकर्त्यांना मुश्रीफ आणि मंडलिक पुन्हा एकत्र यावे, असे मनोमन वाटत होते. यासाठी या दोन नेत्यांना व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी तालुक्यात अनेक कार्यक्रम आखले गेले. कागलमधील कार्यक्रमात मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांनी आपली मने मोकळी केली आणि त्यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे तालुक्यात आता पुन्हा नव्या वळ्णावरचे राजकारण पाहावयास मिळणार आहे. या राजकारणाचे पडसाद मुरगूड आणि कागल नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
सध्या मुरगूड नगरपालिककेवर पाटील आणि मुश्रीफ यांचीच सत्ता आहे. आगामी निवडणुकीसाठी मंडलिक गटाने या ना त्या कारणावरून शहरात मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन केले आहे. पाटील गटाने मुश्रीफांचा नागरी सत्कार घेऊन आपल्या गटाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. समरजितसिंह घाटगे यांनीही मुरगूडवर लक्ष केंद्रित केले आहे. एका कार्यक्रमात घाटगे यांनी मंडलिक यांची जोरदार स्तुती केली होती. शाहू कारखाना बिनविरोध होण्यासाठी मुश्रीफांच्या बरोबरीने मंडलिक यांनीही मदत केल्यामुळे दोन ‘दादा’ व ‘साहेब’ आता एकत्र राहणार, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्याशिवाय हमिदवाडा साखर कारखान्यावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय मंडलिक यांनी मुरगूड पालिकेत आपल्याबरोबर जे येतात त्यांना घेऊ. पाटील बंधूसुद्धा बरोबर आले तरी चालतील, असे सांगून धक्का दिला होता. पाटील गटाच्या मेळाव्यातही मंडलिक गटावर टीका झाली नाही.
मुश्रीफ यांना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने, तर संजय मंडलिक यांना लोकसभेच्यादृष्टीने गोळाबेरीज करणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळेच मुरगूड नगरपालिकेत पाटील-मंडलिक-मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांची एकत्रित सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे खात्रिलायक समजते.
आरक्षणावर लढतीची धार
दरम्यान, नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार असून, त्याचे आरक्षण अद्याप पडलेले नाही. त्यामुळे लढतीचे पुरेपूर चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आरक्षण निश्चित झाल्यांनतर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत स्पष्ट कल निश्चित होणार आहे.