मुरगूडचे रुग्णालय सलाईनवर
By Admin | Updated: December 21, 2015 00:38 IST2015-12-21T00:15:36+5:302015-12-21T00:38:51+5:30
अधीक्षकासह तीन पदे रिक्त : रुग्णांची हेळसांड; प्रशासकीय खेळखंडोबा

मुरगूडचे रुग्णालय सलाईनवर
अनिल पाटील-- मुरगूड -येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्तच असल्याने उपलब्ध डॉक्टरांवर रुग्ण तपासणीचा अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णांना दिवसभर तिष्ठत बसावे लागत आहे. पुरेशा डॉक्टरांविना हे रुग्णालयच सध्या सलाईनवर आहे.
या ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे ते अडीचशे बाह्यरुग्णांची नोंद, रक्त चाचण्या, प्रसूती आदींसाठीही झुंबड उडालेली असते. कागल, भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील रुग्णांची संख्या मोठी आहे. मोफत उपचारामुळे या ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा जास्त आहे; पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यातच काही डॉक्टर मुद्दामच गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. बी. थोरात यांची बदली होऊन वर्ष सरत आले. ही जागा अद्याप रिक्त आहे. अधीक्षक नसल्याने प्रशासन व आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. अधीक्षक पदाचा कार्यभार डॉ. पी. वाय. तारळेकर यांच्याकडे सोपविला आहे. प्रशासकीय काम, दररोज दोनशे ते अडीचशे रुग्णांना सामोरे जाणे त्यांना अशक्य आहे. मध्यंतरी स्थानिकचे डॉ. स्वप्निल माळवदे यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे जादा वेळ देऊन ते रुग्णांना सेवा देत होते; पण त्यांचीही गगनबावडा येथे बदली झाल्याने तेही पद रिकामेच आहे. अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या डॉ. तारळेकर यांच्यावरच सर्वस्वी जबाबदारी येत आहे. प्रशासन चालवायचे, आरोग्यसेवेकडे लक्ष द्यावयाचे की रुग्णांना सामोरे जायचे, अशा अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अपघातातील गंभीर रुग्ण दाखल झाला, तर बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना वाऱ्यावर सोडून डॉक्टरांना गंभीर रुग्णांवर उपचार करावे लागतात. दरम्यान, बालरोगतज्ज्ञ डॉ. शामसुंदर सागर यांची बदली झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून या विभागातील सेवाही कोलमडली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. अमर पाटील दाखल झाले असले तरी येथील आरोग्यसेविकांची संख्या अपुरी आहे. शासनाने या रुग्णालयातील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबरोबरच येथील निवासस्थान, क्ष किरण विद्युत पुरवठा, आदी समस्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. चालढकलपणा करण्यामध्येच अधिकारी धन्यता मानत आहेत. आपणही रिक्त पदांबाबत वेळोवेळी चर्चा केली आहे. आश्वासन दिले आहे. पाहू कधी अधिकारी रूजू होतात.
- रणजित सूर्यवंशी,
सल्लागार समिती सदस्य,
ग्रामीण रुग्णालय, मुरगूड