खड्ड्यांचा ‘चंद्र’; धुळीतच ‘ईश्वर’

By Admin | Updated: December 22, 2014 00:21 IST2014-12-22T00:21:39+5:302014-12-22T00:21:39+5:30

सौंदर्य, वैभव लोपले : जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका रस्ता अद्यापही अपूर्ण, कचऱ्याची समस्या

'Moon' of pits; 'God' in the dust | खड्ड्यांचा ‘चंद्र’; धुळीतच ‘ईश्वर’

खड्ड्यांचा ‘चंद्र’; धुळीतच ‘ईश्वर’

कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला रंकाळा तलाव जलपर्णी, सांडपाणी व ढासळणाऱ्या संरक्षक भिंतींमुळे अखेरची घटका मोजत आहे. टॉवर ते जुना वाशीनाका या रस्त्याचे काम गेली साडेपाच वर्षे सुरू आहे. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पाचवीलाच पुजलेले आहे. ‘रंकाळ्याजवळ नाही, आम्ही कुठंतरी बाहेर वाळवंटातच राहतोय की काय, असं वाटतंय’ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे. शहराच्या पश्चिम भागातील चंद्रेश्वर प्रभागाचा लेखाजोखा (क्र. ४८) ‘प्रतिबिंब’ या मालिकेतून मांडताना ‘लोकमत’ने घेतलेला कानोसा.
दाटीवाटीचा आणि अस्सल कोल्हापुरी बाज असलेला प्रभाग म्हणून ‘चंद्रेश्वर’ परिचित आहे. अजूनही या प्रभागातील घरे जुन्या खापरीची आहेत. प्रत्येक घराचे एकमेकाला आढे... अन् एकमेकाला रात्री-अपरात्रीसुद्धा मदतीला धावून जाण्याची वृत्ती. या प्रभागाची रचना गोलाकृती आहे. प्रभागात बुवा चौक, मरगाई गल्ली, महाकाली भजनी व तालीम मंडळ, संध्यामठ गल्ली, उभा मारुती चौक, हनुमान देऊळ,बोंद्रे गल्ली, चंद्रेश्वर गल्ली, वाणी गल्ली, नागोजीराव पाटणकर हायस्कूलचा परिसर, साकोली कॉर्नर, महाराष्ट्र सेवा मंडळ या परिसराचा समावेश होतो. प्रभागामध्ये मागील निवडणुकीत सहा हजार मतदारांची नोंद होती. नव्याने मतदार नोंदणीसाठी प्रभागाचे नगरसेवक परीक्षित पन्हाळकर प्रयत्नशील आहेत.
प्रभागात घंटागाडी वेळेत येत नसल्याने कोपरा मिळाला की त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. प्रभागातील स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. नगरसेवकांच्या घरासमोरील पेव्हिंग ब्लॉक व्यवस्थित बसवले आहेत. बाकी सर्व ठिकाणांचे पेव्हिंग ब्लॉक तकलादू बसवल्याने ते निखळले आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. सन २०१० पासून जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका रस्ता विविध कामांमुळे अद्यापही अपूर्णच आहे. नागरिकांना या रस्त्यावरील धुळीमुळे घसा बसणे, घरात सातत्याने धुळीचे थर साचणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. संध्यामठसमोरील रस्त्यावर ड्रेनेजचे काम तर तकलादू केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
विद्यमान नगरसेवक :
परीक्षित पन्हाळकर
गतवेळचे मतदार : ६ हजार
प्रमुख समस्या
४रस्त्याचे अपुर्ण काम, जागोजागी खड्डेच खड्डे
४अवेळी येणारी घंटागाडी
४अस्वच्छ स्वच्छतागृहे
४उखडलेले पेव्हींग ब्लॉक
४धुळीचे साम्राज्य
विकासकामांचा दावा
४जावळाचा गणपती ते वाशी नाका रस्ता कामाला मंजूरी
४१० दिवसात रस्ता खुला होण्याची आशा
चंद्रेश्वर प्रभाग हा दाट लोकवस्तीची आहे. जुन्या धाटणीचे गल्लीबोळ असल्याने या ठिकाणी कचरा गाडी येणे शक्य नाही. मात्र, दररोज घंटागाडी येणे अपेक्षित आहे. याशिवाय रंकाळा तलावातील ऐेतिहासिक संध्यामठाचेही जतन होणे अपेक्षित आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व मूलभूत सेवासुविधा मिळणे अपेक्षित आहे. जेणेकरून ही सर्व जबाबदारी नगरसेवकांची आहे.
- स्वराज्य सरनाईक , नागरिक ग्
ोल्या सहा वर्षांत खोदलेला जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करून नगरसेवकांनी नागरिकांचा दुवा घ्यावा. याचबरोबर रंकाळा तलाव स्वच्छ करून त्यातील जीवसृष्टी जगवावी आणि परिसरातील नागरिकांची दररोज येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका करावी.
- अभिजित सरनाईक, नागरिक
महासभेत जावळाचा गणपती ते जुना वाशी नाका हा रस्ता मंजूर झाला आहे. ‘एलबीटी’च्या माध्यमातून येणाऱ्या रकमेतून याचे काम केले जाणार आहे. याचबरोबर कचऱ्याच्या समस्येवर आणखी घंटागाड्या वाढविल्या जातील. प्रभागातील अनेक बोळांमध्ये रस्त्याऐवजी महापालिका नगरसेवक निधीतून पेव्हिंग ब्लॉक घालून दिले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत हा रस्ता पूर्ण करून वाहतुकीस खुला केला जाईल.
- परीक्षित पन्हाळकर, नगरसेवक

Web Title: 'Moon' of pits; 'God' in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.