अपुऱ्या सुविधांचा पर्यटकांना मन:स्ताप

By Admin | Updated: May 23, 2015 00:42 IST2015-05-22T21:24:08+5:302015-05-23T00:42:59+5:30

आंबा परिसर विकासासाठी निधी हवा : पर्यटन केंद्रासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

Mood of tourists for insufficient facilities | अपुऱ्या सुविधांचा पर्यटकांना मन:स्ताप

अपुऱ्या सुविधांचा पर्यटकांना मन:स्ताप

आंबा : कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबा हे निसर्गरम्य व थंड हवेचे पर्यटनस्थळ. जंगलातील गाव म्हणून शहरातील भांडवलदारांनी प्लॉटिंगच्या व्यवसायात येथे मोठी गुंतवणूक केली आहे. पर्यटक व प्लॉटधारकांच्या वाढत्या संख्येत येथे मूलभूत सुविधा अपु-या तर काही कुचकामी ठरल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून बीएसएनएल सुविधेचा येथे बोजवारा उडाला आहे. वीज गेली की रेंज गायब असे चित्र असल्याने पंचक्रोशीने खासगी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मागणी केली आहे. तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून वीजदाब नियमित नसल्याने वीजेची साधने जळण्याचे प्रकार घडतात. शिवाय पुरेशा विद्युत जनित्राअभावी ग्राहकांच्या मागणीनुसार वीज कनेक्शन मिळत नाही. लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या आणि गंजलेले डांब ही दुरवस्था कोण सुधारणार हा प्रश्न आहे. मानोली, आंब्यासह दहा गावांना एकच वायरमन कार्यरत आहे. सार्वजनिक सुलभ शौचालयाअभावी विशाळगड भाविकांची मोठी कुचंबणा होते. बसस्थानक, विशाळगड फाटा परिसर गलिच्छ बनला आहे. सुलभ शौचालयाची, स्वच्छता व पाणपोईची येथे गरज आहे.
आंबा-विशाळगडासह डोंगरातील चाळीस गावांसाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत पूर्ण आहे. मात्र, इमारत गळती दुरूस्तीसह कर्मचारी निवासव्यवस्था, शवविच्छेदनगृह व शस्त्रक्रिया थिएटरची साधनसामग्री यासाठी निधी नाही. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका व सेविका आदी पदे दीड वर्षांपासून रिक्त आहेत. वाढते अपघात पाहता येथे आरोग्य सुविधा परिपूर्ण असाव्यात, असा आग्रह आहे. येथील पाणीपुरवठा योजना मानोली गावास सलग्न आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे पाणी अपुरे पडते. चार तास वीज खंडित झाली की टाकीत पुरेसे पाणी साठवता येत नाही. पाणी गळती व वाटपातील शिस्त दूर करून मानोलीसाठीची योजना पूर्ण करण्याची गरज आहे.
चाळणवाडी व धनगरवाड्याला जोडणारा रस्ता चार दशकांपासून धुळखात आहे. प्राथमिक शाळेसह अंगणवाडीची नूतन इमारत गळत आहे. येत्या पावसाळ्यात मुले शाळेत बसविणे धोक्याचे आहे. दुरूस्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. ग्रामदैवत अंबेश्वर मंदिराची गळती दुरूस्ती लांबणीवर पडली आहे. गावातील रस्त्याचे बांधकाम दर्जेदार नसल्याची तक्रार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केली.

पर्यटक व भाविकांच्या सुविधांसाठी व येथील निसर्ग रक्षणासाठी प्रस्तावित पर्यटन आराखडा मंजूर झाल्यास येथील प्रेक्षणीय ठिकाणांच्या विकासाबरोबर रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, खेळ व मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता होईल. पावनखिंड, विशाळगड पाठोपाठ आंबा, मानोली, केर्ले, तळवडे या परिसरातील निसर्ग ठिकाणांच्या विकासाला निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

Web Title: Mood of tourists for insufficient facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.