मान्सूनपूर्व बरसला छप्पर फाडके!

By Admin | Updated: June 6, 2016 01:10 IST2016-06-06T01:09:32+5:302016-06-06T01:10:41+5:30

जिल्ह्याला झोडपले : अनेक ठिकाणी घरांचे छत उडाले; झाडे उन्मळून पडली; अंधाराचे साम्राज्य

Before the Monsoon Roar Six! | मान्सूनपूर्व बरसला छप्पर फाडके!

मान्सूनपूर्व बरसला छप्पर फाडके!

कोल्हापूर : रविवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल एक तासभर झालेल्या या वादळी पावसाने उचगाव (ता. करवीर) येथे अनेक घरांचे छत उडून गेले. वाठार (ता. हातकणंगले) येथील ओढ्यावर श्रमदानातून बांधलेला बंधारा वाहून गेला, तर इचलकरंजीत गटारीचे पाणी अनेक घरांत शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. याशिवाय जिल्ह्यातील अनेक भागांत डिजिटल फलक, विद्युतवाहिन्या तुटून पडल्या; तर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. येथे रविवारी दिवसभर ढगांचे आच्छादन राहिले.

कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या वळवाची अपेक्षा होती; पण गेले आठ दिवस वरुणराजा हुलकावणी देत होता. रविवारी रात्री बारा वाजता मेघगर्जनांचा आक्रोश करीत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तासभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजेच्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या. पावसाबरोबर विजेचे एवढे रौद्ररूप होते, की घराबाहेर पडण्याचे धाडस होत नव्हते.
सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गटारींमधून पाणी रस्त्यांवर आल्याने कोल्हापूर शहरातील रस्त्यांना अक्षरश: तळ्यांचे स्वरूप आले होते. विजेच्या तारा तुटल्याने तब्बल बारा तास ग्राहकांना अंधारात बसावे लागले.
पावसाने झोपमोड केली असली तरी गेले महिनाभर पिके करपू लागल्याने झोप उडालेल्या बळिराजाला मात्र रात्री सुखाची झोप लागली. दीड-दोन महिन्यांनी शिवारात पाणी उभे राहिलेले पाहून शेतकरी आनंदित झाला. जिल्ह्यात सरासरी १४.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला.
रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. दिवसभर आकाशात ढगांचेच आच्छादन होते. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाल्याने मान्सूनची सुरुवात झाल्यासारखे वातावरण राहिले.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
करवीर- १९, कागल- १८.९४, पन्हाळा- १९.०२, शाहूवाडी- २८, हातकणंगले- ११.१२, शिरोळ- १२.८५, राधानगरी- १५.५०, गगनबावडा- ३४, भुदरगड- १५, गडहिंग्लज- ०.१४, आजरा- २, चंदगड- निरंक.

Web Title: Before the Monsoon Roar Six!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.