पाणलोटमध्ये पाण्याऐवजी पैसाच जिरवला
By Admin | Updated: July 19, 2015 00:27 IST2015-07-19T00:22:59+5:302015-07-19T00:27:30+5:30
सर्वच कामांवर संशयाचे ढग : यंत्रणा हडबडली ; गांभीर्याने विषय रेटणे आवश्यक

पाणलोटमध्ये पाण्याऐवजी पैसाच जिरवला
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षांत झालेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत झालेली कामे व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसत असल्याने संपूर्ण कामावरच संशयाचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत. या कार्यक्रमातून डोंगरमाथ्यावर पाणी जिरवण्या ऐवजी ठेकेदार, अधिकाऱ्यांनी आपल्या घरातच पैसा जिरवल्याचे सत्य बाहेर येत आहे. याची चौकशी सुरू असली, तरी किती गांभीर्याने विषय रेटला जाणार, यावरच वस्तुस्थिती समोर येणार आहे.
पाणलोटमधील भ्रष्टाचाराची चर्चा विधिमंडळात झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी ‘पाणलोट’च्या कामातील भ्रष्टाचाराबाबत गेले दोन महिने रान उठविले. जलयुक्त शिवार अभियान, वसुंधरा पाणलोट विकास कामांमध्ये पर्यवेक्षक, ठेकेदारा व अधिकाऱ्यांनी तीस कोटींचा ढपला पाडल्याची तक्रार देवणे यांनी कृषी अधीक्षकांकडे केली होती. राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांत शेततळी, नालाबांध, जमीन सपाटीकरणाची अनेक कामे झाली. यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता, अंदाजपत्रक न करता व ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामे केली आहेत. काम कधी सुरू झाले आणि कधी संपले हेच ग्रामस्थांना कळले नसल्याने कामाबाबत तक्रारी सुरू झाल्या. जिल्ह्यात कामात अनियमितता असली, तरी भुदरगड, राधानगरी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
याचा मुद्दा शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधिमंंडळात लावून धरल्याने हे प्रकरण धसास लागणार आहे. या कामांची चौकशी सुरू आहे; पण चौकशी अधिकारी किती गांभीर्याने त्याकडे बघणार, यावरच हा अहवाल अवलंबून असणार आहे. विधिमंडळात चर्चा झाल्याने गैरव्यवहाराचे प्रकरण चौकशी अधिकाऱ्यांसाठी सोपे राहिलेले नाही.