लाभार्र्थींकडून पैसे उकळण्याचा डाव उधळला
By Admin | Updated: August 7, 2014 00:23 IST2014-08-06T23:55:41+5:302014-08-07T00:23:15+5:30
मिरज पंचायत समितीमधील घटना : पश्चिम भागातील महिला सदस्याचा प्रताप

लाभार्र्थींकडून पैसे उकळण्याचा डाव उधळला
मिरज : मिरज पंचायत समितीने खरेदी केलेल्या कडबाकुट्टी यंत्रासाठी पश्चिम भागातील एका महिला सदस्येचा लाभार्र्थींकडून जादा पैसे उकळण्याचा सुरू असलेला प्रयत्न सदस्यांनी आज (बुधवारी) हाणून पाडला. सदस्यांनी कडबाकुट्टी यंत्रासाठी पन्नास टक्के रकमेच्या माहितीचा फलक लावण्यासही कृषी अधिकाऱ्यांना भाग पाडले.
मिरज पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून कडबाकुट्टी यंत्र व विद्युत मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत. सध्या पंचायत समितीत उपलब्ध असणाऱ्या कडबाकुट्टी यंत्राचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप सुरू आहे. कडबाकुट्टी यंत्रासाठी ८ हजार ५०० रुपये व शेतकरी मासिकांसाठी २०० रुपये असे एकूण ८ हजार ७०० रुपये पन्नास टक्के रक्कम भरावयाची आहे. प्रत्येक सदस्याच्या वाट्याला १० कडबाकुट्टी यंत्रे आली आहेत. सदस्यांच्या शिफारशीने वाटप सुरू आहे. असे असताना पन्नास टक्के अनुदानापेक्षा जादा पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे लाभार्र्थींच्या तक्रारीवरून उघडकीस आले. पश्चिम भागातील लाभार्र्थींना कडबाकुट्टीसाठी १२ हजार रुपये भरावे लागतील, अशी सक्ती करण्यात आली होती.
लाभार्र्थींनी थेट पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधला असता, संबंधित महिला सदस्याकडून जादा पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे लाभार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पंचायत समितीच्या सदस्यांकडेही खासगीत तक्रारी केल्यामुळे विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, सतीश निळकंठ, दिलीप बुरसे, शंकर पाटील या सदस्यांनी या लुबाडणुकीची दखल घेऊन कृषी अधिकाऱ्यांना कोणत्याही सदस्यांच्या सांगण्यावरून अनुदान रकमेपेक्षा जादा पैसे घेऊ नयेत, अशी सूचना दिली.
तसेच भरावयाच्या रक मेच्या माहितीचा फलक लावण्यासही भाग पाडले. सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे परस्पर जादा पैसे उकळण्याचा महिला सदस्येचा प्रयत्न उधळला. याची पंचायत समितीमध्ये जोरदार चर्चा होती. (वार्ताहर)