पैशाचे वाटप; वळंजूंच्या बंगल्याची झडती
By Admin | Updated: October 16, 2014 00:48 IST2014-10-16T00:45:15+5:302014-10-16T00:48:16+5:30
दोघे संशयित तरुण ताब्यात : जवाहरनगर येथे वळंजू यांच्या बंगल्यासभोवती प्रचंड पोलीस बंदोबस्त

पैशाचे वाटप; वळंजूंच्या बंगल्याची झडती
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर, दत्त कॉलनी, शिरत मोहल्ला येथे आमदार महादेवराव महाडिक यांचे खंदे कार्यकर्ते माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या ‘लक्ष्मी आनंद’ बंगल्यातून पैसे घेऊन ते मतदारांना वाटप करीत असल्याच्या संशयावरून दोघा तरुणांना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वत: पकडले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित प्रवीण बाबासाहेब व्हटकर (वय ३९, रा. जवाहरनगर) व नितीन पाटील अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, या प्रकाराचे वृत्त शहरात पसरताच पाटील व महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार करताच काही क्षणांतच अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसह क्राइम ब्रँच यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व निवडणूक भरारी पथकाने वळंजू यांच्या बंगल्याची व वाहनांची सुमारे दोन तास कसून तपासणी केली असता संशयास्पद काहीही मिळून आले नसल्याची माहिती भरारी पथकाचे प्रमुख एस. के. माने यांनी दिली.
अशी घडली घटना
संवेदनशील जवाहरनगर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास येथील दत्त कॉलनी, शिरत महोल्ला येथे महिला मतदानासाठी हातामध्ये पांढऱ्या रंगाची पाकिटे घेऊन जात असल्याचे माजी गृहराज्यमंत्री पाटील यांच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी चौकशी केली असता आम्हाला माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या घरातून पाकिटाचे वाटप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पाटील यांना फोनवरून हा प्रकार सांगितला. ते काही क्षणांतच वळंजू यांच्या घरासमोर आले. त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन चव्हाण, प्रदीप उलपे होते. यावेळी घरातून बाहेर पडणारे दोन तरुण त्यांना पाहून पळून निघाले. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडले. या प्रकाराची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलीस व भरारी पथकाकडे तक्रार केली.
अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, क्राईम ब्रँचचे अनिल देशमुख यांच्यासह राज्य राखीव दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी कार्यकर्त्यांना पांगविले. भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले यांना वळंजू यांच्या घरासमोर पांढऱ्या रंगाचे पाकीट सापडले. त्यामध्ये पाचशे रुपयांची नोट होती.
पाकिटावर ‘बी’ असा कोडवर्ड होता, तर भरत तपासे असे नाव कोपऱ्यामध्ये लिहिले होते. त्यावरून पोलीस व भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले व एस. के. माने यांनी वळंजू यांच्या घराची व घरासमोर उभ्या असलेल्या आॅल्टो, स्कार्पिओ व अक्टिव्हा या तीन वाहनांची कसून तपासणी केली असता काही संशयास्पद मिळून आले नाही. दरम्यान, याप्रकरणी भोसले यांनी वळंजू यांच्या घरासमोर संशयास्पदरीत्या मिळून आलेल्या पाचशे रुपयांच्या पाकिटावरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली.
‘ए’ आणि ‘बी’चा फॉर्म्युला
जवाहरनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पैसे वाटप सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना होती. त्यानुसार पोलीस व निवडणूक कार्यालयाचे भरारी पथक या परिसरावर लक्ष ठेवून होते. आज मिळून आलेल्या पाकिटावर ‘बी’ अक्षर असलेला कोडवर्ड मिळून आला. ‘ए’ म्हणजे एक हजार व ‘बी’ म्हणजे पाचशे रुपये असा कोडवर्ड असल्याची चर्चा परिसरात होती.
उडी मारली अन् पाय मोडला
नंदकुमार वळंजू यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील व त्यांचे कार्यकर्ते बाहेर थांबलेले पाहून संशयित प्रवीण व्हटकर व नितीन पाटील हे दोघेजण पाठीमागील बाजूने पळून निघाले. यावेळी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला. बंगल्याच्या संरक्षित भिंतीवर प्रवीण याने उडी मारली आणि त्याचा पाय मोडला. तेवढ्यात कार्यकर्त्यांनी दोघांनाही पकडले.
तपासात निष्पन्न झाल्यास अटक
माजी महापौर वळंजू यांच्या घरासमोर पाचशे रुपये असलेले पाकीट मिळून आले आहे. भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. संशयित दोन कार्यकर्ते ताब्यात आहेत. कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. वळंजू यांचा काही सहभाग आढळून आल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दिली.
गृहराज्यमंत्र्यांकडून घरात घुसून धक्काबुक्की : वळंजू
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून माझ्यासह कुटुंबातील व्यक्तींना धक्काबुक्की केल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली असल्याचे माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. याबाबत राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.