सजावटीसाठी मॉसला मागणी
By Admin | Updated: August 26, 2014 21:49 IST2014-08-26T21:18:22+5:302014-08-26T21:49:36+5:30
गणेशोत्सवाची लगबग : २0 किलोच्या गोणीसाठी ७00 रूपयांचा भाव

सजावटीसाठी मॉसला मागणी
महादेव भिसे - आंबोली --निमसदाहरीत किंंवा सदाहरीत जंगलाचे वैशिष्ट्य काय, असे विचारताच जंगलातील झाडांवर येणारे शेवाळ, असे तज्ज्ञ सांगतील. ज्याला सर्वसाधारणपणे मर्गस, मॉस असे म्हणतो. सध्या गणेश चतुर्थीच्या मखराच्या सजावटीसाठी या मर्गसाला जोरदार मागणी आहे. १५ ते २० किलोच्या गोणीसाठी ७०० ते ८०० रुपये मोजून ग्राहक या मॉसची खरेदी करीत आहेत.
गणेश सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या या शेवाळाला जरी मागणी असली, तरी वन कायद्यानुसार हे शेवाळ जंगलातून काढणे, विकणे अथवा त्याची ने-आण करणे हा गुन्हा असून असे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.
या शैवाळाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे शेवाळ वर्षानुवर्षे जिवंत राहू शकते. पाण्याचे शिंतोडे शेवाळावर मारले की, ते पुनर्जीवित होते. याचा उपयोग वनस्पतींच्या किंवा कलमी फळांची रोपे तयार करणाऱ्या नर्सरीमध्ये तोंड बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर के ला जातो. या शेवाळाच्या तेरा ते चौदा प्रकारच्या जाती आढळून येतात. आंबोलीचे जंगल निमसदाहरीत जंगलाच्या प्रजातीत मोडते. या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे, या जंगलातील झाडांवर वाढणाऱ्या या शेवाळात पाऊस संपल्यानंतर साठून राहणारी आर्द्रता ही या झाडाला वर्षभर सदारहीत राहण्यास मदत करते. या शेवाळात अनेक प्रकारचे कीटक व साप विसावलेले असतात. चाफडा नावाचा निमविषारी साप नेहमीच शेवाळात आढळून येतो. त्यामुळे बऱ्याचवेळा शेवाळाची तस्करी करणाऱ्यांना या सापाकडून ‘प्रसाद’ मिळतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आंबोलीत या शेवाळाची तस्करी करणारी टोळी सध्यातरी कार्यरत नाही.