सोमवारपासून टोलवसुली ? ‘आयआरबी’ची तयारी : कामगारांसह यंत्रणेची जुळणी सुरू
By Admin | Updated: May 15, 2014 01:03 IST2014-05-15T00:53:18+5:302014-05-15T01:03:38+5:30
कोल्हापूर : सर्वाेच्च न्यायालयाने टोलला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली व लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून रिकामे होणारे

सोमवारपासून टोलवसुली ? ‘आयआरबी’ची तयारी : कामगारांसह यंत्रणेची जुळणी सुरू
कोल्हापूर : सर्वाेच्च न्यायालयाने टोलला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविली व लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून रिकामे होणारे पोलीस यामुळे पुढील आठवड्यात सोमवारपासून पुन्हा टोल वसुली सुरू करण्याची तयारी आयआरबीने केली आहे. यासाठी आवश्यक कामगार, यंत्रणा व प्रशासकीय कागदपत्रांची जोडणी सुरू असल्याची माहिती आयआरबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मनोज चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील टोल वसुलीस दिलेली स्थगिती ५ मे रोजी सर्वाेच्च न्यायालयाने उठविली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या निकालावर फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. टोलची लढाई आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात उन्हाळी सुटी संपल्यावर १२ जूननंतर रंगणार आहे. तोपर्यंत आयआरबीस उच्च न्यायालयाचा पुढील आदेश मिळेपर्यंत टोलवसुलीस सुरुवात करता येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे कोणत्याही क्षणी टोलवसुलीची तयारी आयआरबीने केली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने टोलवसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्याची सूचना केल्याचे आयआरबीचे म्हणणे आहे. निवडणुकीचा निकाल लागताच टोलवसुली सुरू करण्याची तयारी आयआरबीने केली आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व यंत्रणा उभारणीचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आवश्यक यंत्रणा उभारणीनंतर पुढील आठवड्यात सोमवारनंतर केव्हाही टोल वसुलीस सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.